न्यूयॉर्क :  टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले आहेत.  भारतीय प्रमाण वेळेनुसार ही मॅच आज रात्री 8 वाजता सुरु होणार होती. मात्र, पावसामुळं मॅचला उशीर झाला आहे. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमनं टॉस जिंकला. बाबर आझमनं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळं भारताला पहिल्यांदा फलंदाजीला उतरावं लागणार आहे. 


रोहित शर्माला या मॅचमध्ये भारतीय संघात बदल करण्यात आले आहेत का असं विचारलं असता त्यानं संघात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत असं म्हटलं. त्यामुळं भारतीय संघाकडून विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघे सलामीला उतरतील हे निश्चित आहे. रोहित शर्मानं यावेळी संघात कोणतेही बदल न केल्यानं भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाज, दोन स्पिनर, दोन ऑलराऊंडर यासह मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय. 


भारतीय संघाकडून विराट कोहली आणि रोहित शर्मा डावाची सुरुवात करतील हे स्पष्ट झालं आहे. संघात कोणताही बदल करण्यात आलेला नसल्यानं रिषभ पंत तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला येऊ शकतो. रोहित शर्मानं काल  पत्रकार परिषदेला संबोधित केलं. त्यावेळी सलामीवीरांशिवाय दुसऱ्या कुणाचं स्थान निश्चित नसल्याचं म्हटलं होतं. भारतीय गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग करेल. 


पावसामुळं मॅच सुरु होण्यास उशीर झाला आहे. मात्र, न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. मॅचला उशीर झाला असला तरी भारत आणि पाकिस्तानच्या कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांचं लक्ष या मॅचकडे लागलं आहे.


भारताचा संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिवम दूबे, रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा,मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग


पाकिस्तान: मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम (कॅप्टन), उस्मान खान, फखर जमान, इमाद वसीम, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन शाह अफ्रिदी, हारिस रऊफ ,मोहम्मद आमिर, नसीम शाह,  


दरम्यान, भारतीय संघ टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवर वरचढ ठरलेला आहे. आजच्या मॅचमध्ये भारतीय संघ त्याची पुनरावृत्ती करतो का हे पाहावं लागेल. 


संबंधित बातम्या :


IND vs PAK: भारत पाक मॅचपूर्वी शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, येत्या काही दिवसात पोलखोल करणार, टायमिंग सांगितलं


T20 World Cup Ind vs Pak: महामुकाबला! टी-20 विश्वचषकात आज भारत अन् पाकिस्तान यांच्यात लढत; सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर