न्यूयॉर्क: टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये (T20 World Cup 2024) आज भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक विरोधक आमने सामने येणार आहेत. न्यूयॉर्कमध्ये ही मॅच भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री 8 वाजता सुरु होणार आहे.  या मॅचपूर्वी पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका टीव्ही कार्यक्रमात पाकिस्तानच्या टीममध्ये एकता कमी दिसते, असा प्रश्न शाहिद आफ्रिदीला विचारण्यात आला होता. याबाबत या मागं बाबर आझम कारण असू शकेल, असं म्हटलं. मात्र,या गोष्टीवर टी-20 वर्ल्ड कप नंतर  खुलेपणानं चर्चा करणा असल्याचं आफ्रिदी म्हणाला. 



टी-20 वर्ल्ड कप पाकिस्तान क्रिकेट बोर्डात खांदेपालट झाली होती. पीसीबी चेअरमन पासून कॅप्टनपर्यंत सर्व गोष्टी बदलण्यात आल्या होत्या. बाबर आझमकडून कॅप्टनपद काढून शाहीन आफ्रिदीला देण्यात आलं होतं. टी-20 च्या संघाचं कॅप्टनपद शाहीन आफ्रिदीकडे देण्यात आलं होतं. मात्र, वर्ल्ड कप पूर्वी पुन्हा एकदा बाबर आझमला कॅप्टन करण्यात आलं. 



शाहिद आफ्रिदीनं समा टीव्हीसोबत बोलताना म्हटलं की, पाहा अनेक गोष्टी असतात, इथं मोहम्मद वसीम आहेत, ज्यांनी निवड समितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. अनेक गोष्टी त्यांना माहिती आहेत. सोहेल यांना पण सर्व गोष्टी माहिती असतील पण ते खुलेपणानं बोलत नाहीत, असं आफ्रिदी म्हणाला. 


शाहिद आफ्रिदीनं म्हटलं की, मी पण कॅप्टन्सी केलेली आहे. कॅप्टन सर्वांचा नेता असतो. कॅप्टन एक तर टीमचं वातावरण खराब करु शकतो  किंवा चांगली टीम निर्माण करतो. कोच आणि इतर लोक नंतर येतात. सर्वात महत्त्वाचा कॅप्टन असतो, असं शाहिद आफ्रिदीनं म्हटलं. 



मला अनेक गोष्टींमध्ये जायचं नाही, शाहिन आफ्रिदी माझा नातेवाईक आहे. अनेकांना वाटेल जावयाची भूमिका घेत पण तसं नाही. माझ्यासाठी जी चूक आहे ती चूक आहे. आम्ही  काही चुका केल्या आहेत. बोर्डानं, मोठ्या लोकांनी आणि निवड समितीनं मोठ मोठ्या चुका गेल्या काही दिवसांमध्ये केल्या आहेत. वर्ल्ड कप झाल्यानंतर सर्व गोष्टींबाबत खुलेपणानं बोलणार असल्याचं शाहिद आफ्रिदीनं म्हटलं.



दरम्यान, टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत  आणि पाकिस्तान आज आमने सामने येणार आहेत. अमेरिकेविरुद्ध पराभव पत्करल्यानं पाकिस्तानचा सुपर 8 चा मार्ग खडतर बनला आहे. 


संबंधित बातम्या :


IND vs PAK: भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज लढतीत कोण जिंकणार? हरभजन-इरफान पठाण, वसीम आक्रम ते गावसकर, दिग्गजांनी सांगितलं कोण जिंकणार?


T20 World Cup Ind vs Pak: महामुकाबला! टी-20 विश्वचषकात आज भारत अन् पाकिस्तान यांच्यात लढत; सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर