IND vs NZ 2nd Test : मुंबई कसोटीवर भारताची पकड, दुसऱ्या दिवसाखेर विराटसेनेकडे 332 धावांची आघाडी
India vs New Zealand 2nd Test Day 2 Stumps : मोहम्मद सिराज आणि आर. अश्विन यांच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंड संघाचा डाव अवघ्या 62 धावांवर संपुष्टात आला.
India vs New Zealand 2nd Test Day 2 Stumps : वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारतीय संघानं मजबूत पकड मिळवली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाकडे 332 धावांची आघाडी होती. एजाजच्या भेदक फिरकी माऱ्यापुढे भारतीय संघाचा पहिला डाव 325 धावांत संपुष्टात आला होता. भारतीय गोलंदाजांनीही न्यूझीलंडला जशासतसं प्रत्युत्तर दिलं. भारतीय गोलंदाजीपुढे न्यूझीलंडचा डाव ढेपाळला. सिराज-अश्विन यांच्या भेदक माऱ्याला अक्षर पटेलची चांगली साथ मिळाली. न्यूझीलंडचा डाव अवघ्या 62 धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंड संघाला फक्त 62 धावांवर गारद केल्यामुळे पहिल्या डावात भारतीय संघाकडे 263 धावांची विशाल आघाडी होती. भारतीय संघानं फॉलऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामी फलंदाज गिल दुखापतग्रस्त असल्यामुळे चेतेश्वर पुजारानं मयांक अग्रवाल याच्यासोबत डावाची सुरुवात केली. दुसऱ्या दिवसाचा डाव संपला तेव्हा भारतीय संघानं बिनबाद 69 धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडे तब्बल 332 धावांची आघाडी झाली आहे. दुसऱ्या दिवसा अखेर सलामी फलंदाज मयांक अग्रवाल 38 तर चेतेश्वर पुजारा 29 धावांवर नाबाद आहेत.
एजाज पटेलच्या विश्वविक्रमाच्या बळावर न्यूझीलंड संघानं भारताला पहिल्या डावात 325 धावांवर रोखलं. एजाज पटेलनं संपूर्ण भारतीय संघाला बाद करत विश्वविक्रम रचला. मात्र, न्यूझीलंडला हा आनंद फार काळ साजरा करता आला नाही. कारण, भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत न्यूझीलंड संघाला अवघ्या 62 धावांत गुंडाळलं. कर्णधार केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत खेळणारा न्यूझीलंडचा संघ अतिशय दुबळा दिसत होता. 325 धावांचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. सिराजने आघाडीच्या तीन फलंदाजांना बाद करत न्यूझीलंडचं कंबरडं मोडलं. तर अश्विनने चार फलंदाजांना बाद करत न्यूझीलंडची अवस्था अधिकच बिकट केली. अक्षर पटेलने दोन तर जयंत यादव यांने एक बळी घेतला. न्यूझीलंडकडून एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फंलदाजी करता आली नाही. कर्णधार टॉम लेथम, रॉस टेलर, डॅरेल मिचेल, विल यंग आणि हेन्री निकोलस यासारख्या फलंदाजांना आपल्या लौकिकास खेळी करण्यात अपयश आलं. न्यूझीलंडकडून फक्त दोन फलंदाजांना दहा धावांचा टप्पा ओलांडता आला. जेमिसनने सर्वाधिक 17 धावा केल्या तर लेथमला दहा धावा करता आल्या. यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा ओलांडता आला नाही.
एजाज पटेलच्या फिरकी माऱ्यापुढे भारतीय संघ ढेपाळत होता. अशात सलामीवीर फलंदाज मयांक अग्रवाल आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांनी भारतीय संघाचा डाव सावरला. मयांकने 150 धावांची खेळी केली तर अक्षर पटेल याने अर्धशतकी खेळी केली. एजाज पटेलने दर्जेदार आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत संपूर्ण भारतीय संघाला बाद केलं.