India vs Australia Womens T20 Semifinal: ICC T20 महिला विश्वचषक 2023 मधील टीम इंडियाचा (Team India) प्रवास अखेर संपला. ऑस्ट्रेलियानं (Australia) टीम इंडियाच्या स्वप्नांवर पाणी फेरून 5 धावांनी पराभव करत स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. केपटाऊनमध्ये खेळवल्या गेलेल्या पहिल्या सेमीफायनल्सच्या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून 5 धावांनी दारूण पराभव स्वीकारावा लागला. आता 26 फेब्रुवारीला जेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा सामना इंग्लंड किंवा दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या सेमीफायनलमधील विजेत्याशी होईल.
सेमीफायनल्समध्ये 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. टीम इंडियानं पहिले तीन विकेट 3.4 षटकांत 28 धावांत गमावले होते. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरनं 34 चेंडूत 52 धावा आणि जेमिमाह रॉड्रिग्जने 24 चेंडूत 43 धावा करत संघाला सांभाळलं. मात्र त्यांच्या खेळीचा फारसा फायदा झाला नाही.
शेवटच्या 5 षटकांत टीम इंडियानं सामना गमावला
टीम इंडियानं 14.3 षटकांत 4 गडी गमावून 133 धावा केल्या होत्या. हरमन आणि ऋचा घोष क्रीजवर होत्या, त्यामुळे टीम इंडिया सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. पण इथूनच ऑस्ट्रेलियानं आपल्या विजयाची कहाणी लिहिली आणि पुढच्या केवळ 5 षटकांत टीम इंडियाच्या 4 विकेट्स काढल्या आणि संपूर्ण सामनाच फिरवला.
भारताचा निम्मा संघ 133 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. हरमन 52 धावांवर रनआउट झाली. यानंतर दोन धावांनी संघाला सहावा धक्का बसला आणि ऋचाही 14 धावांवर बाद झाली. स्नेह राणा 157 धावांवर माघारी परतली. तर राधा यादव 162 धावांवर बाद होणारी आठवी खेळाडू होती. एकापाठोपाठ एक विकेट्स पडल्या आणि टीम इंडिया विजयाकडून पराभवाकडे गेली. शेवटच्या केवळ 5 षटकांत कांगारूंनी सामना आपल्या बाजूनं फिरवला.
टीम इंडिया 167 धावांवर गारद
टॉस जिंकून सर्वात आधी फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघानं 4 गडी गमावून 172 धावा केल्या. संघाकडून बेथ मुनीने 37 चेंडूत 54 धावांची खेळी केली. तर कर्णधार मेग लॅनिंगने 49 आणि ऍश्ले गार्डनरने 31 धावा केल्या. शिखा पांडेनं 2 बळी घेतले. तर दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांना 1-1 विकेट घेण्यात यश मिळालं.
ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया 8 गडी गमावून 167 धावाच करू शकला. या सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं घाईघाईत अर्धशतक ठोकलं. त्यानं 34 चेंडूत 52 धावांची खेळी केली. जेमिमा रॉड्रिग्जने 24 चेंडूत 43 धावा केल्या.
हेड-टु-हेड
एकूण टी-20 रेकॉर्ड पाहिल्यास भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खूपच कमकुवत आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 30 टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने केवळ 6 सामने जिंकले आहेत. तर 23 सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच, एक सामना बरोबरीत राहिला, तर एक सामना अनिर्णीत राहिलाय.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला T20 विक्रम
एकूण टी 20 सामने : 30
टीम इंडियानं जिंकलेले सामने : 6
ऑस्ट्रेलियानं जिंकलेले सामने : 22
बरोबरीत सुटलेला सामना : 1
अनिर्णीत राहिलेला सामना : 1
महत्त्वाच्या इतर बातम्या :