INDW vs AUSW, Semi Final : भारतीय महिला संघाचं विश्वचषक विजयाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 172 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल भारतीय संघ 167 धावांपर्यंत मजल मारु शकला. यानंतर भारतीय चाहते पराभवाची कारणं शोधत आहेत. पाहूयात.. कोणत्या कारणामुळे भारताचा पराभव झाला.. 


भारताच्या पराभवाचं प्रमुख कारण आघाडीची फळी अपयशी ठरणे हे होय. सलामी फलंदाज शेफाली वर्मा (9), स्मृती मंधाना (2) आणि यास्तिका भाटिया (4) या आघाडीच्या तीन फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला निराशाजनक सुरुवात मिळाली. परिणामी भारताला पराभवाचा सामना करावा लागला. 


खराब फिल्डिंग हेही भारताच्या पराभवाचं कारण आहे. एकीकडे ऑस्ट्रेलियाच्या फिल्डर्सनी जिवाचं रान करत धावा रोखल्या.. तर दुसरीकडे भारताच्या फिल्डर्सनी सोपे झेल सोडले.. गरज नसताना एकेरी दुहेरी धावा दिल्या. ऋचा घोष आणि शेफाली वर्मा यांनी झेल सोडले. याचा फटका टीम इंडियाला बसला. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग हिला सुरुवातीलाच जिवनदान दिले. त्याशिवाय बेथ मूनीचाही झेल सोडला. या दोन्ही फलंदाजांनी नंतर धावांचा पाऊस पडला. 


भारताची खराब गोलंदाजी -


उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी खराब कामगिरी केली. स्नेह राणा, राधा यादव, शिखा पांडे, रेनुका सिंह आणि दिप्ती शर्मा एकाही गोलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. एकाही गोलंदाला धावा रोखण्यात यश आले नाही. शिखा पांडेनं सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर राधझा यादव आणि दिप्ती शर्मा यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. रेणुका सिंह सर्वात महागाडी गोलंदाज ठरली. रेणुकाने चार षटकात दहा पेक्षा जास्त सरासरीने धावा लुटल्या.  


जेमिमा-हमरनप्रीत लढल्या -
तीन विकेट झटपट पडल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत आणि जेमिमा यांनी भारताचा डाव सावरला. जेमिमाने अवघ्या 24 चेंडूत 43 धावांची खेळी केली. तर हरमनप्रीतने कर्णधाराला साजेशी खेळी करताना अर्धशतक झळकावले. हरमनप्रीतने 34 चेंडूत 52 धावांची खेळी केली. हरमनप्रीतने आपल्या खेळीदरम्यान एक षटकार आणि सहा चौकार लगावले. हरमनप्रीत कौर आणि जेमिमा या दोघींनी चौथ्या विकेटसाठी 41 चेंडूत 69 धावांची भागिदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी विजयासाठी पूर्णपणे प्रयत्न केले, पण इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. परिणामी भारताचा पाच विकेटनं पराभव झाला.