India vs Australia Indore Test: आज टीम इंडियाची मदार गोलंदाजांच्या खांद्यावर; कांगारुंना थोपवण्याचं मोठं आव्हान
India vs Australia Indore Test: इंदूर कसोटीत आज दुसऱ्या दिवसाचा खेळ होणार आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 47 धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात भारतीय संघ केवळ 109 धावा करू शकला.
India vs Australia Indore Test: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Team Australia) यांच्यात इंदूरमध्ये तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. आज (2 मार्च) दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सामन्यात सुरुवात होणार आहे. कांगारुंचा संघ दुसऱ्या दिवशी 4 गडी बाद 156 धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात करेल. कॅमेरुन ग्रीन 6 आणि पीटर हँड्सकॉम्ब 7 धावा करुन नाबाद आहेत. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला हे दोघे मैदानात उतरतील. पण आजच्या सामन्याची खरी मदार टीम इंडियाच्या गोलंदाजांवर असणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने सर्वात आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण रोहितचा हा निर्णय टीम इंडियासाठी फारसा फायदेशीर ठरला नाही. भारतीय संघ पहिल्या डावात पुरता गडगडला आणि 109 धावांतच गारद झाला. काल (1 मार्च) भारतीय संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक 22 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघाकडून मॅट कुनहानेमनने सर्वाधिक 5 बळी घेतले. तसेच नॅथन लायनला 3 आणि टॉड मर्फीला एक विकेट्स मिळाल्या.
टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी गोलंदाजांकडून अपेक्षा
इंदूर कसोटीचा दुसरा दिवस भारतीय संघासाठी खूप खास असणार आहे. फलंदाजांच्या चुका भरुन काढण्याची जबाबदारी आज टीम इंडियाच्या गोलंदाजांवर असणार आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी फिरकीपटू रवींद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाच्या चार विकेट्स घेतल्या. आता दुसऱ्या दिवशीही जाडेजाकडून खूप अपेक्षा आहेत.
सामन्यात पकड मिळवण्यासाठी आता दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाला 200 ते 250 च्या स्कोअरमध्येच थांबवावं लागणार आहे. यासोबतच भारतीय फलंदाजांना दमदार सुरुवात करावी लागणार आहे. टीम इंडियाला दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभी करुन ऑस्ट्रेलियाला आव्हान द्यावं लागणार आहे.
जाडेजाची सर्वोत्कृष्ट खेळी
भारत सर्वबाद झाल्यावर फलंदाजीला ऑस्ट्रेलियाचा संघ आल्यावर त्यांनी सुरुवातीपासून चांगली फलंदाजी केली. सलामीवीर ट्रेविस हेड 9 धावांवर जाडेजाकडून बाद झाल्यावर ख्वाजा आणि लाबुशेनने डाव सावरला. पण या दोन्ही सेट फलंदाजांना आणि त्यानंतर कॅप्टन स्टीव्ह स्मिथलाही जाडेजाने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत तंबूत धाडलं आहे. दिवस संपताना जाडेजाने 24 षटकं टाकून 63 धावा देत 4 महत्त्वाचे विकेट्स घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंच्या जाळ्यात टीम इंडियाचे फलंदाज अडकले
दिल्ली कसोटीतून रेड-बॉल क्रिकेटमध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या मॅथ्यू कुहनेमनने दुसऱ्या कसोटीत भारताच्या पहिल्या डावात फारच अप्रतिम कामगिरी केली आहे. कुहनेमनला पदार्पणाच्या कसोटीत केवळ दोन विकेट मिळाल्या होत्या. पण आपल्या दुसऱ्या कसोटीत कुहनेमनने पहिल्या चार षटकांतच टीम इंडियाला 3 धक्के देत एका डावात 5 विकेट्स घेण्याचा मान मिळवला. कुहनेमनने प्रथम कर्णधार रोहित शर्माला (12 धावा) यष्टिमागे झेलबाद केलं. त्यानंतर त्याच्या पुढच्याच षटकात सलामीवीर शुभमन गिलला (21 धावा) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. श्रेयस अय्यरला (0) बोल्ड करुन अखेर अश्विन आणि उमेश यादव या अखेरच्या फळीतील महत्त्वाच्या विकेट्सहील त्याने घेतल्या. याशिवाय अनुभवी नॅथन लायनने चेतेश्वर पुजारा (1 धाव) आणि रवींद्र जाडेजा (4 धावा) आणि केएस भरत (17 धावा) या विकेट्स घेतल्या. तर मर्फीने विराटची (22 धावा) मोठी विकेट घेतली.