Rohit Sharma on Virat Kohli: इंग्लंडविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यात पराभव झाला असला तरी, भारतानं 2-1 अशा फरकानं टी-20 मालिका जिंकली. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्मशी सामना करत असलेल्या भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) टी-20 मालिकेतही मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरला. इंग्लंडविरुद्ध अखेरचा टी-20 सामना गमावल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) पत्रकार परिषदेत विराट कोहलीच्या फॉर्मवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक खेळाडूला खराब फॉर्मचा सामना करावा लागतो, असं म्हणत रोहित शर्मानं विराट कोहलीची पाठराखण केलीय.


विराटच्या फॉर्मबाबत दिग्गाजांची नकारात्मक प्रतिक्रिया
विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून खेळपट्टीवर संघर्ष करताना दिसतोय. या कालावधीत विराटला मोठी धावसंख्या करता आली नाही. ज्यामुळं विराट कोहलीचं भारतीय संघातील प्लेईंग इलेव्हन मधील स्थान कायम राहतं का नाही? असे प्रश्न उपस्थित केले जातायेत. नुकतंच भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांच्यासहीत अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी विराटच्या फॉर्मवर नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.


रोहित शर्मा काय म्हणाला?
“बाहेरचे लोक काय म्हणतात? याकडे आम्ही लक्ष देत नाहीत. विराटवर टीका करणारे तज्ज्ञ कोण आहेत? हे मला माहित नाही. त्यांना तज्ज्ञ का म्हणतात? हे देखील मला समजत नाही. संघात काय चालले आहे? हे त्यांना कळत नाही. ते फक्त बाहेरून खेळ बघत आहेत. आम्ही एक संघ बनवत आहोत. खेळाडूंना कमबॅक करण्यासाठी संधी दिली जाते. बाहेरच्या लोकांना हे काहीही माहिती नाही. खूप विचार करूनचं निर्णय घेतला जातो. त्यामुळं बाहेर काय चाललंय? हे महत्त्वाचं नाही."


विराटवर टीका करणाऱ्यांना रोहितनं झापलं
प्रत्येक खेळाडूचा फॉर्म वर-खाली होतच असतो.परंतु, यामुळं खेळाडूची गुणवत्ता कधीच घसरत नाही. एखाद्यावर टीका करताना ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. माझ्यासोबतही असं घडलं आहे आणि इतरांनाही खराब फॉर्मला सामोरं जावा लागतं. एखाद्या खेळाडूनं त्याच्या कारकिर्दीत सातत्यानं चांगली कामगिरी केली. त्यानंतर त्याला खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे तर, त्या खेळाडूबाबत वाईट बोलणं चुकीचं आहे", अशा शब्दात रोहित शर्मानं विराटवर टीका करणाऱ्यांना झापलं आहे. 


विराटची खराब फॉर्मशी झुंज
इंग्लंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या बर्मिगहॅम कसोटीतही विराटला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानंतर पहिल्या टी-20 सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. परंतु, अखेरच्या दोन्ही टी-20 सामन्यात तो चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, दुसऱ्या टी-20 मध्ये सामन्यात तो एक धाव करून माघारी परतला. त्यानंतर त्यानं तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात 11 धावा केल्या. 


हे देखील वाचा-