(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India Test Team : कसोटी संघातून डच्चू मिळाल्यानंतर रिद्धिमान साहाचा संताप; गांगुली, द्रविडवर केले गंभीर आरोप
Wriddhiman Saha : मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी रिद्धिमान साहाला (Wriddhiman Saha) टीम इंडियात स्थान मिळू शकले नाही.
Wriddhiman Saha : मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी रिद्धिमान साहाला (Wriddhiman Saha) टीम इंडियात स्थान मिळू शकले नाही. भारतीय क्रिकेट संघात स्थान न मिळू शकल्याने संतापलेल्या रिद्धिमानने याबाबत बोलताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या प्रति आपला राग व्यक्त केला आहे. तो म्हणाला आहे की, राहुल द्रविडने (Rahul Dravid) त्याला निवृत्तीचा विचार करण्याचा सल्ला दिला होता.
यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा म्हणाला की, ''संघ व्यवस्थापनाने फार पूर्वीच सांगितले होते की आता मला संघात स्थान दिले जाणार नाही. मी आजपर्यंत हे सांगितले नाही, कारण मी टीम सेट अपचा भाग होतो. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही मला आधीच निवृत्तीचा विचार करण्याचा सल्ला दिला होता.''
यावेळी साहा यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचाही उल्लेख केला. साहा म्हणाला, ''गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जेव्हा मी न्यूझीलंडविरुद्ध नाबाद 61 धावा केल्या होत्या, तेव्हा दादांनी व्हॉट्सअॅपवर मेसेज करत माझे अभिनंदन केले होते. जोपर्यंत ते बीसीसीआयचे सर्वेसर्वा आहेत, तोपर्यंत मला भारतीय संघात निवडीची काळजी करण्याची गरज नाही, असेही ते मला म्हणाले होते. बोर्डाच्या अध्यक्षांनी असा मेसेज केल्याने माझा आत्मविश्वास खूप वाढला होता. मात्र असं सर्व असताना हे सारं अचानक इतक्या लवकर कसे बदलले, हे मला समजत नाही आहे.''
दरम्यान, रिद्धिमानसह आणखी तीन अनुभवी क्रिकेटपटूंना आगामी कसोटी मालिकेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. यामध्ये चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी या सर्व दिग्गजांची संघात निवड केली जाणार नसल्याचे जाहीर करताना सर्व वरिष्ठांना रणजी करंडक स्पर्धा खेळण्यास सांगण्यात आले आहे. या फॉर्ममध्ये चांगली कामगिरी केल्यास त्यांची पुन्हा भारतीय क्रिकेट संघात निवड केली जाणार असल्याचे ते म्हणाले आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha