Jasprit Bumrah Injury Updates: ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. यापूर्वी भारतीय संघाला मोठा दिलासा देणारी माहिती समोर आलीय. भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरत असून तो लवकरच भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. 


इनसाइड स्पोर्ट्सनं बीसीसीआयच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, “जसप्रीत बुमराहची फिटनेस आता चांगली असून तो दुखापतीतून सावरतोय. टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत जसप्रीत बुमराह संघात सामील होईल, अशी, बीसीसीआयला आशा आहे. 


दुखापतीमुळं जसप्रीत बुमराह संघाबाहेर
आशिया चषकाला सुरुवात होण्यापूर्वी जसप्रीत बुमराहच्या रुपात भारतीय संघाला मोठा धक्का बसला.जसप्रीत बुमराहला पाठदुखीच्या तीव्र दुखापतीमुळं आशिया चषकातून बाहेर पडावं लागलं. मात्र, त्यानंतर जसप्रती बुमराह राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पोहचला असून दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करतोय. 


लवकरच बुमराहचे भारतीय संघात पुनरागमन
जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा तिन्ही फॉरमेटमधील महत्वाचा गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराह आगामी टी-20 विश्वचषकाला मुकण्याची चिंता व्यक्त केली जात होती. परंतु, तो दुखापतीतून सावरत असल्याची माहिती समोर येताच त्याच्या चाहत्यांसह भारतीय संघानंही सुटकेचा श्वास घेतलाय. 


हर्षल पटेलची दुखापतीशी झुंज
जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त भारताचा स्टार गोलंदाज हर्षल पटेलही दुखापतीनं ग्रस्त आहे. ज्यामुळं त्यालाही आशिया चषकात विश्रांती देण्यात आलीय. बुमराहसह तोही राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याच्या फिटनेसवर काम करत आहे. महत्वाचं म्हणजे, हर्षल पटेलच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही अपडेट समोर आली नाही. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा संभाळत आहे. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल तंदुरुस्त झाल्यानंतर आवेश खानला टी-20 विश्वचषक संघातून वगळलं जाऊ शकतं.


आशिया चषकात भारताची विजयी सलामी
यूएईमध्ये सुरु असलेल्या आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पाच विकेट्सनं पराभव करून या स्पर्धेची विजयी सुरूवात केलीय. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भेदक गोलंदाजी करत पाकिस्तानच्या संघाला 19.3 षटकात 147 धावांवर गुंडाळलं. भारतानं हा सामना 5 विकेट्सनं जिंकला. या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. 


हे देखील वाचा-