Team India ODI Rankings : भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यातील एकदिवसीय मालिका भारताने 3-0 च्या फरकाने जिंकत झिम्बाब्वेला त्यांच्याच भूमीत व्हाईट वॉश दिला. त्यामुळे भारताला आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्येही (ICC ODI Team Rankings) फायदा झाला. भारत आयसीसी वनडे टीम रँकिंग्समध्ये तिसऱ्या स्थानी असून भारताला एका गुणाचा फायदा झाला असून भारताची रेटिंग 111 झाली आहे.


दुसरीकडे पाकिस्तानने देखील नेदरलँड्सला 3-0 च्या फरकाने मात दिली ज्यामुळे त्यांची रेटिंगही वाढून खात्यावर 107 पॉइंट्स जमा झाले असून ते चौथ्या स्थानी पोहोचले आहेत. या यादीत पहिल्या स्थानावर न्यूझीलंडचा संघ (124 रेटिंग पॉइंट्स) आहे. तर दुसऱ्या स्थानी इंग्लंडचा (119 रेटिंग पॉइंट्स) संघ आहे.  


भारत ऑक्टोबरमध्ये खेळणार एकदिवसीय मालिका


भारतीय संघ आता आशिया कपच्या तयारीत व्यस्त आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेनंतर ऑक्टोबरमध्ये भारत-दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ याच महिन्यात झिम्बाब्वेविरुद्ध तीन वनडे सामने खेळेल. त्यानंतर सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात ही एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. यामुळे या साऱ्या सामन्यानंतरही आयसीसी एकदिवसीय संघ रँकिंगमध्ये नक्कीच बदल होतील. 


कशी जिंकली भारताने मालिका?


भारताने मालिकेतील पहिल्याच सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली. ज्यानंतर 189 धावांवर झिम्बाब्वेला रोखत, भारताने हे लक्ष केवळ 30.5 षटकात पूर्ण करत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आधी दीपक, अक्षर आणि प्रसिध यांच्या भेदक गोलंदाजीनंतर सलामीवीर शुभमन आणि शिखर दोघांनी अप्रतिम अशी अर्धशतकं झळकावत भारताचा विजय पक्का केला. दुसऱ्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या झिम्बाब्वेच्या संघानं निराशाजनक कामगिरी केली. या सामन्यात झिम्बाब्वेचा संघ 38.1 षटकांत 161 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारतानं 25.4 षटकात 5 विकेट्स गमावून 167 धावा करत सामना जिंकला. तिसऱ्या सामन्यात भारताने  सामन्यात आधी फलंदाजीवेळी शुभमन गिलचं (Shubhman Gill) दमदार असं शतक आणि गोलंदाजीत अखेरच्या षटकात शार्दूल, आवेश जोडीने केलेल्या भेदक माऱ्यामुळे भारत जिंकला आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी घेतली. ज्यानंतर शुभमनच्या शतकाच्या जोरावर भारताने 290 धावांचे लक्ष्य झिम्बाब्वेला दिले. त्यानंतर झिम्बाब्वेचा अनुभवी फलंदाज सिकंदर रझा (Sikandar Raza) याने अप्रतिम शतक ठोकत साऱ्यांचीच मनं जिंकली. शतक ठोकत त्याने संघाला अगदी विजयाजवळ आणलं पण काही धावा कमी पडल्याने झिम्बाब्वे पराभूत झाला आहे.


हे देखील वाचा-