Shubman Gill : भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) अखेर आपलं पहिलं-वहिलं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं आहे. तब्बल 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील 30 डावानंतर त्याने शतकाला गवसणी घातली आहे. अनेकदा 90 धावांवर बाद झाल्याने त्याच्यावर नर्व्हस 90 (Nervous 90) चा ठपका लागला होता. तो देखील आज धुवून निघाला आहे. शुभमनने भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 97 चेंडूत 15 चौकार आणि 1 षटकार ठोकत 130 धावा केल्या आहेत. 






शुभमन गिल फार कमी सामन्यांत आपल्या क्लासिक खेळीमुळे एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून नावारुपाला आला आहे. त्याने आतापर्यंत अधिक धावा केल्या नसल्या तरी त्याच्या दमदार शॉट्समुळे त्याला ओळखलं जातं. आधी अंडर 19 विश्वचषक विजयी संघाचा उपकर्णधार आणि मालिकावीर असणाऱ्या शुभमनने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून नाव मिळवलं. यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरातकडून खेळताना त्याने संघाला चषक जिंकवून देण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केली.


नर्व्हस 90 चा दुष्काळ संपला


विशेष म्हणजे भारताच्या ऐतिहासिक गाबा येथील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी विजयातही शुभमनत्या 91 धावा अत्यंत महत्त्वपूर्ण होत्या. तेव्हाही 9 धावांनी त्याचं शतक हुकलं होतं. आता काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या भारत-वेस्ट इंडीज सामन्यातही शुभमनचं शतक केवळ 2 धावांमुळे राहिलं होतं. पावसाच्या व्यत्ययामुळे तो शतक पूर्ण करु शकला नाही. पण आज मात्र त्याने झिम्बाब्वेविरुद्ध शतक पूर्ण करत इतिहास रचला आहे. याआधी त्याने एकदिवसीय सामन्यात 98 धावांसह 82 तसंच 61 धावांची खेळीही केली आहे. विशेष म्हणजे त्याने हरारे क्रिकेट स्टेडियममध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड केला आहे. 130 धावा करत त्याने अंबाती रायडूचा 124 धावांचा रेकॉर्ड मोडला आहे.


झिम्बाब्वेसमोर 290 धावाचं आव्हान


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सलामीवीर शिखर धवन आणि केएल राहुलनं संयमी खेळी करत भारताच्या डाव पुढे नेला. दोघांमध्ये पहिल्या विकेट्ससाठी 79 चेंडूत 50 धावांची भागेदारी झाली. भारताची धावसंख्या 63 वर असताना केएल राहुलच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. या सामन्यात केएल राहुल 46 चेंडूत 30 धावा करून माघारी परतला.  ब्रॅडली इवांसनं त्याला बाद केलं. त्यानंतर शुभमन गिल मैदानात आला. शिखर धवन बाद झाल्यानंतर शुभमन गिलनं इशान किशनसोबत 140 धावांची शतकी भागेदारी करत संघाचा डाव सावरला. ईशान किशन 50 धावा करुन बाद झाल्यानंतर शुभमन गिलनं 130 धावा केल्या. ज्यामुळे भारतानं 289 धावा करत झिम्बाब्वेला 290 धावाचं आव्हान दिलं आहे. 


हे देखील वाचा-