IND W vs BAR W, CWG 2022: कॉमनवेल्थ क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय महिला क्रिकेट संघ बार्बाडोसशी (India Women vs Barbados Women) भिडणार आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून बार्बाडोसनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघानं आपपल्या गटातील एक-एक सामना गमावलाय. या गटात समावेश करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट महिला संघानं उपांत्य फेरीचं तिकीट निश्चित केलंय. तर, भारताविरुद्ध पराभवानंतर पाकिस्तानचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. यामुळं आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीतील स्थान पक्क करण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत.
बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिल्या क्रिकेट सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला चांगलीच झुंज दिली. भारताची सलामीवीर शेफाली वर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार खेळी केली. दरम्यान, भारताची गोलंदाज रेणुका सिंहनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार प्रदर्शन करून दाखवलं. तिनं अवघ्या 18 धावा खर्च करून ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाजांना माघारी धाडलं होतं. यानंतर भारतीय संघानं आपल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा संघ अवघ्या 99 धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात स्मृती मानधनाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं विजय मिळवला.
भारताचा प्लेईंग इलेव्हन संघ:
शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया (विकेटकिपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, स्नेह राणा, मेघना सिंग, रेणुका सिंग, पूजा वस्त्राकर.
बार्बाडोसचा प्लेईंग इलेव्हन संघ:
डिआंड्रा डॉटिन, हेली मॅथ्यूज (कर्णधार), कायसिया नाइट (विकेटकिपर), किशोना नाइट, आलिया अॅलेने, त्रिशन होल्डर, अलिसा स्कॅंटलबरी, शकेरा सेलमन, शमिलिया कोनेल, शॉन्टे कॅरिंग्टन, शनिका ब्रूस.