IND vs WI T20, Highlights : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने दमदार असा 7 गडी राखून वेस्ट इंडीजवर  विजय मिळवला आहे. या विजयामुळे भारताने मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. भारताकडून सूर्यकुमार यादव याने अप्रतिम अशी 76 धावांनी खेळी केली, ज्यामुळे भारत सामन्यात विजय मिळवू शकला.


सामन्यात सर्वप्रथम भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडीजला स्वस्तात सर्वबाद करण्याची रणनीती भारताने आखली होती. पण वेस्ट इंडीजकडून काईल मायर्स याने एकहाती झुंज देत अखेरपर्यंत संघाचा डाव सावरला. त्याने 50 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकार ठोकत 73 धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर फलंदाजांनी खास कामगिरी केली नाही. पण वेस्ट इंडीज एक तगडं आव्हान भारतासमोर ठेवू शकली. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक दोन तर हार्दीक आणि अर्शदीप यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


165 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताचा कर्णधार रोहित शर्मा 11 धावा करुन दुखापतीमुळे तंबूत परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर (24) आणि पंत (33) यांनी सूर्यकुमारला चांगली साथ दिली. सूर्यकुमारने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. 44 चेंडूत 76 धावा ठोकून तो बाद झाला, पण त्याने भारताला विजयाजवळ नेऊन ठेवलं. पंतने नाबाद 33 धावा ठोकत भारताचा विजय पक्का केला. या विजयामुळे भारत मालिकेत 2-1 ने आघाडीवर पोहोचला आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने 68 धावांनी विजय मिळवला होता, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीजने 5 गडी राखून विजय मिळवला आणि मालिका 1-1 च्या बरोबरीत आली. आता तिसरा सामना भारताने जिंकत मालिकेत आघाडी घेतली आहे.


हे देखील वाचा-