IND vs WI, 2nd T20I:भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील (India vs West Indies) पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-20 सामना सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्क येथे खेळला गेला. या सामन्यात विंडीजनं भारताचा पाच विकेट्स राखून पराभव केला. ओबेड मॅकॉय (Obed McCoy) वेस्ट इंडीजच्या विजयाचा शिल्पकार ठरला. ओबेड मॅकॉयनं भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात चार षटकात केवळ 17 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या. भारताविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सहा विकेट घेणारा मॅकॉय हा जगातील पहिला गोलंदाज ठरलाय. 


भारताविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात ओबेड मॅकॉयनं भारताचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, आर अश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत इतिहास रचला. मॅकॉयनं सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर रोहितला बाद करून माघारी धाडलं. त्यानंतर भारताचे फलंदाज त्याच्या गोलंदाजीसमोर संघर्ष करताना दिसले.


ट्वीट-



भारताविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजी
भारताविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा विक्रम श्रीलंकेचा वनिंदू हसरंगा यांच्या नावावर आहे. त्यानं 2021 मध्ये भारताविरुद्ध कोलंबो येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात 4/9 अशी कामगिरी केली होती. याआधी, जगातील कोणत्याही गोलंदाजानं भारताविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतले नव्हते.


भारताविरुद्ध ओबेड मॅकॉयची भेदक गोलंदाजी
ओबेड मॅकॉयच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताचा संघ 19.4 षटकात 138 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 19.2 षटकांत 5 बाद 141 धावा करून सामना जिंकला. मॅकॉयला त्याच्या चमकदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. मॅकॉयची टी-20 आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची पहिलीच वेळ आहे. 


हे देखील वाचा-