India vs West Indies : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत 3 धावांनी विजयी झाला आहे. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. सामना भारताने जिंकला असला तरी वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी दिलेली दमदार झुंज सर्वांच्याच स्मरणात राहील. वेस्ट इंडीजच्या रोमारीयो शेफर्ड आणि अकेल हुसेन यांनी अखेरच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी केली, पण केवळ 3 धावा कमी पडल्याने वेस्ट इंडीज सामना जिंकू शकले नाहीत. आधी फलंदाजी करत भारताने 50 षटकात 308 धावा केल्या. विजयासाठी वेस्ट इंडीजला 50 षटकात 309 धावा करायच्या होत्या. पण वेस्ट इंडीज 50 षटकात 6 गडी गमावून 305 धावाच करु शकले.


सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या भारताने सुरुवातीपासून तुफान फटकेबाजी सुरु केली. शिखर आणि शुभमन जोडीने दमदार फलंदाजी करत शतकी भागिदारी पूर्ण केली. संघाच्या 119 धावा झाल्या असताना शुभमन 64 धावांवर धावचीत झाला. त्यानंतर शिखर 97 धावा करुन तंबूत परतला. मग श्रेयसने सर्व जबाबदारी घेतली. पण तो देखील 54 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर मात्र पुढील सर्व फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. हुडा (27) आणि अक्षर पटेल (21) यांनी काहीशी फिनिशिंग करत धावसंख्या पुढे नेली. ज्यामुळे वेस्ट इंडीजला 309 धावा जिंकण्यासाठी करणं अनिवार्य होतं. वेस्ट इंडीजकडून अल्झारी जोसेफ आणि गुडाकेश मोटे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर रोमारियो शेफर्ड आणि अकेल हुसेन यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.


रोमारियो आणि अकेलची झुंज व्यर्थ


309 धावांचे आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या वेस्ट इंडीजने सुरुवात उत्तम केली. कायल मायर्सने 75 एस. ब्रुक्सने 46 धावा करत चांगली सुरुवात केली. ब्रँडन किंगनेही 54 धावा करत अर्धशतक झळकावलं. त्यामुळे वेस्ट इंडीजची धावसंख्या चांगली वाढली होती. पण विजयासाठी अजूनही धावांची गरज असतान सेट फलंदाज बाद होत गेले. पण अखेरच्या षटकांमध्ये वेस्ट इंडीजच्या रोमारीयो शेफर्ड आणि अकेल हुसेन यांनी तुफान फटकेबाजी केली. पण केवळ 3 धावा कमी पडल्याने ते संघाला विजय मिळवू देऊ शकले नाहीत. रोमारियोने नाबाद 39 तर अकेलने नाबाद 33 धावा केल्या. भारताकडून चहल, ठाकूर आणि सिराजने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. सामन्यात 97 धावांची दमदार खेळी करणारा भारताचा कर्णधार शिखर धवन सामनावीर ठरला.


हे देखील वाचा-