India vs Sri Lanka Women’s T20 World Cup 2024 Updates : न्यूझीलंडविरुद्धचा पराभव आणि पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षपूर्ण विजयानंतर, टीम इंडियाने आता 2024 च्या महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेला धूळ चारली आहे. आशियाई चॅम्पियन श्रीलंकेविरुद्धच्या गट टप्प्यातील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने 82 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. यासह टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठ्या विजयाची चव चाखली.


कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या उत्कृष्ट अर्धशतकांनंतर अरुंधती रेड्डी आणि रेणुका सिंग यांच्यासह गोलंदाजांच्या घातक कामगिरीमुळे टीम इंडियाने स्पर्धेत दुसरा विजय नोंदवला. यासह भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा बळकट केल्या आहेत. शेवटच्या गट सामन्यात टीम इंडियाचा सामना आता गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे, जो सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.




श्रीलंकेने टेकले गुडघे


173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ कधी सामन्यात दिसला नाही. डावाच्या पहिल्याच षटकात रेणुका सिंगने विष्मी गुणरत्नेला खाते न उघडता पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर पुढच्याच षटकात रेणुकाने कर्णधार चमारी अटवपट्टूलाही आऊट केले. झटपट तीन विकेट गमावल्यानंतर कविशा दिलहरी आणि अनुष्का यांनी चौथ्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी केली. मात्र, दोघेही पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर श्रीलंकेचा डाव अवघ्या 90 धावांत संपूर्ण संघ गडगडला.


शेफाली आणि मंधानाची स्फोटक सुरुवात 


शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी मिळून 12.4 षटकांत पहिल्या विकेटसाठी 98 धावा जोडल्या. शेफालीने 40 चेंडूत 43 धावा केल्या, तर मानधनाने 38 चेंडूत 50 धावांची तुफानी खेळी केली. यानंतर कर्णधार हमनप्रीत कौरने पदभार स्वीकारत श्रीलंकेच्या गोलंदाजांना रडवले. हरमनने 27 चेंडूंचा सामना करत 52 धावांची नाबाद खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान त्याने 8 चौकार आणि एक गगनचुंबी षटकार लगावला. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रमही हरमनप्रीतच्या नावावर आहे. शेवटच्या षटकांमध्ये जेमिमाह रॉड्रिग्जने 10 चेंडूत 16 धावा केल्या.


टीम इंडिया खेळणार उपांत्य फेरीत? जाणून घ्या समीकरण


श्रीलंकेविरुद्धच्या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. नेट रनरेटच्या बाबतीत हरमनप्रीत अँड कंपनीने आता न्यूझीलंडला मागे टाकले आहे. मात्र, अखेरच्या साखळी सामन्यातही टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा विजय आवश्यक असेल.


हे ही वाचा -


Ind vs Ban 2nd T20 : ग्वाल्हेरनंतर टीम इंडियाने जिंकला दिल्लीचा किल्ला; बांगलादेशचा सुपडा साफ, टी-20 मालिका 2-0 ने भारताच्या खिशात