India vs Bangladesh 2nd Test : कसोटी मालिकेनंतर आता टीम इंडियाने बांगलादेशला टी-20 मालिकेतही गुडघे टेकण्यास भाग पाडले आहे. ग्वाल्हेरनंतर टीम इंडियाने दिल्लीचा किल्ला पण सहज जिंकला. या विजयासह टीम इंडियाने टी-20 मालिका जिंकली. नितीश रेड्डी आणि रिंकू सिंग यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 221 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ निर्धारित षटकांत नऊ गडी गमावून केवळ 135 धावा करू शकला. यासह भारताने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. याआधी भारताने बांगलादेशचा 2-0 असा पराभव करून कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केला होता.


नितीश रेड्डी आणि रिंकू सिंगचा तांडव


टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा 25 धावा होईपर्यंत पॅव्हेलियनमध्ये परतले होते. सॅमसन 10 धावा करून बाद झाला तर अभिषेक शर्मा 15 धावा करून बाद झाला. त्याच्यापाठोपाठ कर्णधार सूर्यकुमार यादवही 8 धावा करून स्वस्तात बाद झाला. त्यानंतर नितीश रेड्डी आणि रिंकू सिंग यांनी मिळून अवघ्या 48 चेंडूत 108 धावा करून भारताला सामन्यात आणले. नितीशने 34 चेंडूत 74 धावा केल्या, ज्यात त्याने 4 चौकार आणि 7 षटकार मारले. दुसरीकडे रिंकूने 29 चेंडूत 53 धावा केल्या.


शेवटच्या 8 षटकात 99 धावा 


एकवेळ टीम इंडियाची धावसंख्या 3 विकेट गमावून 122 धावा होती. पुढच्याच षटकात मेहदी हसनने 26 धावा दिल्या. इथून चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत राहिला. अखेरच्या 8 षटकांमध्ये भारतीय संघाने तुफानी शैलीत फलंदाजी करत एकूण 99 धावा केल्या. 14व्या षटकात 74 धावा काढून नितीश बाद झाला, पण हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंगने धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. हार्दिकने 19 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 32 धावा केल्या. 19व्या षटकापर्यंत टीम इंडियाने 213 धावा केल्या होत्या आणि भारतीय संघ 230 धावांचा टप्पा सहज पार करेल असे वाटत होते. पण शेवटच्या षटकात एकूण 3 विकेट पडल्या, त्यामुळे टीम इंडियाला स्कोअरबोर्डवर 221 धावा करता आल्या. बांगलादेशकडून रिशाद हुसेनने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान यांनी 2-2 विकेट घेतल्या.


बांगलादेशची फलंदाजी ठरली अपयशी


222 धावांचे मोठे लक्ष्य समोर होते आणि अशा स्थितीत बांगलादेश संघ दडपणाखाली गेला. अर्शदीप सिंगने भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याने इमनला बोल्ड केले. यानंतर वॉशिंग्टन सुंदरनेही विकेट घेतली. वरुण चक्रवर्तीने शानदार गोलंदाजी करत 4 षटकात फक्त 19 धावा देत 2 बळी घेतले. तसेच अभिषेक शर्मा, मयंक यादव आणि रियान पराग यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. नितीश रेड्डीनेही 2 बळी घेतले. बांगलादेशच्या महमुदुल्लाशिवाय क्रीझवर जात काळ कोणी टाकू शकले नाही. लिटन दास, शांतो, मेहदी हसन यांना सुरुवात मिळाली पण त्यांना मोठी खेळी खेळता आली नाही. अखेर टीम इंडियाने शानदार विजयाची नोंद केली.


हे ही वाचा -


Nitish Kumar Reddy Ind vs Ban : 6,6,6,6,6,6... राजधानीत नितीश रेड्डीचा धमाका! दुसऱ्याच सामन्यात 11 चेंडूत ठोकल्या 58 धावा