(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India Pink Ball Test Scorecard: पिंक बॉल कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी? येथे पाहा संपूर्ण आकडेवारी
India Pink Ball Test Scorecard: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना 12 मार्चपासून बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्डेडिअमवर खेळला जाणार आहे.
India Pink Ball Test Scorecard: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना 12 मार्चपासून बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्डेडिअमवर खेळला जाणार आहे. हा सामना डे-नाईट असून पिंक बॉलनं खेळला जाणार आहे. भारतानं आतापर्यंत पिंक बॉलनं किती सामने खेळले आहेत? पिंक बॉल कसोटी सामन्यात भारताची आतापर्यंतची कामगिरी कशी होती? यावर एक नजर टाकुयात.
भारतानं आतापर्यंत पिंक बॉलनं एकूण तीन कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय.
बांग्लादेश विरुद्ध भारताचा 46 धावांनी विजय
भारतानं 2019 मध्ये पहिला पिंक बॉल कसोटी सामना बांग्लादेशविरुद्ध खेळला होता. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्डेडिअमवर खेळला गेला होता. या सामन्यात बांग्लादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात बांगलादेशचा संघ अवघ्या 106 धावांत आटोपला. यानंतर कर्णधार कोहलीच्या शतकामुळं भारतानं 347 धावांवर डाव घोषित केला. बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावातही फारसे काही करू शकला नाही. बांग्लादेशचा संघ 195 धावांत ऑलआऊट झाला. ज्यामुळं भारतानं हा सामना 46 धावांनी जिंकला.
दुसऱ्या पिंक बॉल कसोटीत भारताचा लाजीरवाणा पराभव
भारतानं दुसरा पिंक बॉल कसोटी सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. या सामन्यात भारताला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं पहिल्या डावात 244 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला 191 धावांत रोखून भारतानं 53 धावांची आघाडी घेतली. मात्र, दुसऱ्या डावात भारताचा संघ 36 धावांवर ऑलआऊट झाला. भारतानं दिलेल्या 90 धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाच्या संघानं दोन विकेट गमावून पूर्ण केलं होतं.
तिसऱ्या पिंक बॉल कसोटीत अक्षर पटेलची चमकदार कामगिरी
भारतानं तिसरा पिंक बॉल कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध 2021 मध्ये खेळला. हा कसोटी सामना खूपच मनोरंजक होता. या कसोटी सामन्यात इंग्लंडचा डाव 112 धावांवर आटोपल्यानंतर भारताचा डावही अवघ्या 145 धावांवर आटोपला. यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ 81 धावांवर ऑलआऊट झाला. इंग्लंडनं दिलेलं 49 धावांचं लक्ष्य भारतानं 10 विकेट्स राखून गाठलं. या सामन्यात अक्षर पटेल सामनावीर ठरला. त्यानं 70 धावांत 11 विकेट घेतले.
हे देखील वाचा-
- Maharashtra Kesari : 'महाराष्ट्र केसरी' यंदा साताऱ्यात; 4 ते 9 एप्रिलदरम्यान रंगणार मानाच्या गदेसाठी चुरस
- Cheteshwar Pujara: टीम इंडियात स्थान न मिळाल्यानं चेतेश्वर पुजारानं उचललं मोठं पाऊल
- German Open : जर्मन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सायनासह पीव्ही सिंधू पराभूत, श्रीकांत मात्र विजयी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha