गौतम गंभीर-सूर्यकुमार यादवच्या जोडीची विजयी सुरुवात; रोहित शर्माची मोजकी अन् परफेक्ट रिॲक्शन, काय म्हणाला?
Ind vs SL 3rd T20: टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व सोपवण्यात आले.
Ind vs SL 3rd T20: अत्यंत रोमांचक झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने यजमान श्रीलंकेला (Ind vs SL) सुपर ओव्हरमध्ये नमवले. यासह भारताने तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला.
टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व सोपवण्यात आले. तसेच राहुल द्रविडनंतर गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र सूर्यकुमार यादवने चांगल्या पद्धतीने कर्णधारपद सांभाळलं आणि सामन्यात अनेक चांगले निर्णय घेतले. श्रीलंकेला पराभूत करत टी-20 मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्माने सोशल मीडियावर पोस्ट करत युवा खेळाडूंचा कौतुक केलं आहे. 'परफेक्ट सुरुवात...अभिनंदन टीम इंडिया...', असं रोहित शर्मा म्हणाला.
View this post on Instagram
सूर्यकुमार यादवचे तीन निर्णय गेमचेंजर ठरले
खलील अहमदनं 18 व्या ओव्हरमध्ये 12 धावा दिल्यानंतर श्रीलंकेला विजयासाठी 9 धावांची गरज होती. सूर्यकुमार यादवनं यावेळी रिंकू सिंगला गोलंदाजी दिली. त्यानं कुशल परेराला 46 धावांवर बाद केलं. यानंतर श्रीलंकेला शेवटच्या ओव्हरमध्ये 6 धावांची गरज होती. त्यावेळी सर्वांना वाटत होतं मोहम्मद सिराजनं गोलंदाजी करावी असं वाटत होतं. मात्र, कॅप्टन सूर्यकुमार यादवनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवनं 5 धावा देत दोन विकेट घेतल्या. यामुळं मॅच सुपर ओव्हरपर्यंत पोहचली. यानंतर सूर्यकुमार यादवनं सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी वॉशिंग्टन सुंदरला दिली. त्यानं केवळ दोन विकेट घेतल्या आणि भारताचा विजय सोपा झाला. सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल हे दोघे फलंदाजीला आले. यानंतर सूर्यानं विजयी चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला.
...अन् सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहचला
निसांका बाद झाल्यानंतर कुसल मेंडिस आणि कुसल परेरा यांनी कमान हाती घेतल्याने श्रीलंकन संघासाठी विजय सोपा झाला. त्यांच्यातील 52 धावांच्या भागीदारीने भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले होते पण 16व्या षटकात रवी बिश्नोईने कुसल मेंडिसची विकेट घेत टीम इंडियाने सामन्यात पुन्हा चुरस आणली. पुढच्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरने वानिंदू हसरंगा आणि चारिथ असालंका यांना लागोपाठ दोन चेंडूत बाद करून दुहेरी धक्का दिला. श्रीलंकेला विजयासाठी 6 चेंडूत 6 धावा हव्या असताना सूर्यकुमार यादव गोलंदाजीसाठी आला आणि कमाल केली. फक्त 5 धावा देत सूर्यकुमारने 2 विकेट्स घेतल्या आणि सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहचला.
सुपर ओव्हरमध्ये काय घडलं?
फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आला. पहिला चेंडू वाइड गेला. त्यानंतर एक धाव श्रीलंकेने काढली. वॉशिंग्टनने पुढी दोन्ही चेंडूत दोन विकेट्स घेतल्या. दुसऱ्या चेंडूवर चेंडूवर कुसल परेरा आणि तिसऱ्या चेंडूवर पथुम निसांकाही बाद झाला. श्रीलंकेने सुपर ओव्हरमध्ये केवळ 2 धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी अवघ्या 3 धावा करायच्या होत्या. भारतासाठी सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.
संबंधित बातमी:
Ind vs SL: गौतम गंभीरचा मेसेज, सूर्यकुमार यादवची हालचाल; रिंकू सिंहच्या हातात चेंडू अन् तो एक क्षण!