Ruturaj Gaikwad Viral Video : सेल्फी घेण्यास आलेल्या ग्राउंड्समनला धक्का, ऋतुराजच्या कृतीवर क्रिकेटचाहते संतापले
Ruturaj Gaikwad Viral Video : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो ग्राऊंड्समनला धक्का मारताना दिसत आहे.
Ruturaj Gaikwad Viral Video : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेत (IND vs SA T20) भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडची बॅट काही तळपली नाही. त्यामुळे आगामी टी-20 विश्वचषकासाठी त्याची संघात निवड होणं तसं कठीणच आहे. पण ऋतुराजचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो ग्राऊंड्समनला धक्का मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यादरम्यानचा आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील शेवटच्या टी-20 सामन्यात पावसाचा खेळ पाहायला मिळाला. त्यामुळे मालिका 2-2अशी बरोबरीत सुटली. व्हायरल होत असलेल्या सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या व्हिडीओमध्ये बॅटसह हेल्मेट, पॅड आणि ग्लोव्हज घालून डगआऊटमध्ये बसलेला दिसत आहे. यादरम्यान एक ग्राउंड्समन येतो आणि त्याच्याजवळ बसतो आणि सेल्फी काढू लागतो. तेव्हा गायकवाडने हाताने हलकासा धक्का देत त्याला निघून जाण्यास सांगितलं. ग्राऊंड्समनसोबत ऋतुराजचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. सोशल मीडियावर ऋतुराज गायकवाडवर टीका करत आहेत.
Very bad and disrespectful gesture by Ruturaj Gaikwad. Sad to see these groundsmen getting treated like this 😔#RuturajGaikwad pic.twitter.com/jIXWvUdqIX
— Arnav (@imarnav_904) June 19, 2022
ऋतुराजने पाच डावात 96 धावा
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ऋतुराजने 5 सामन्यांच्या 5 डावात 96 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या फलंदाजीची सरासरी 19.20 होती. यादरम्यान त्याची सर्वोत्तम खेळी 57 धावांची होती. या संपूर्ण मालिकेत गायकवाडने 9 चौकार आणि 5 षटकार लगावले. पहिले दोन सामने गमावल्यानंतर टीम इंडियाने विशाखापट्टणम आणि राजकोट टी-20 जिंकून मालिकेत जबरदस्त पुनरागमन केलं.
बंगळुरुमधील सामन्यात ऋतुराजच्या 10 धावा
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात टी-20 मालिका जिंकण्याचं भारतीय संघाचं स्वप्न अधुरंच राहिलं. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या भूमीवर आतापर्यंत एकही टी-20 मालिका जिंकलेली नाही. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने ही संधी गमावली. बंगळुरु टी-20मध्ये अवघ्या 10 धावा करुन ऋतुराज गायकवाड पॅव्हेलियनमध्ये परतला.