Ind vs SA, 3rd ODI Highlights: केपटाऊनच्या Newlands मैदानात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा आणि मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना पार पडला. शेवटच्या ओव्हरपर्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात भारत अवघ्या 4 धावांनी पराभूत झाला आहे. पहिले दोन सामने गमावून भारताने मालिका गमावलीच होती. पण आता ही मालिका भारताने 3-0 ने गमावली आहे. सामन्यात भारताचा युवा खेळाडू दीपक चाहरने एक अप्रतिम अर्धशतक लगावलं खरं पण संघाला विजय मिळवून देण्यात तो थोडक्यात हुकला.


सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली. भारताची चांगली सुरुवात होऊनही डी कॉक आणि ड्युसेन यांनी आफ्रिकेचा डाव सावरत 287 धावा स्कोरबोर्डवर लावत भारतासमोर 288 धावांचे आव्हान ठेवले होते. सामना सुरु झाल्यानंतर भारताने उत्तम गोलंदाजीने खेळाची सुरुवात केली. आफ्रिकेचे मलान, बावुमा आणि मार्करम हे खेळाडू स्वस्तात माघारी परतले. पण डी कॉक आणि ड्युसेन यांनी डाव सावरला. डी कॉकने 124 धावा करत शतक झळकावलं. तर ड्युसेनने अर्धशतक झळकावत 52 धावा केल्या. त्यानंतर मिलरनेही 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. भारताकडून प्रसिध कृष्णाने सर्वाधिक 3, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन तर युझवेंद्र चहलने एक विकेट घेतली होती. 


शिखर, विराटसह दीपकचं अर्धशतकही व्यर्थ


288 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून शिखर धवन (61) आणि विराट कोहली (65) यांनी अर्धशतकं ठोकली. पण हे दोघे बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज टिकू शकले नाहीत. सूर्यकुमारने 39 धावा केल्या. त्यानंतर दीपक चाहरने एकहाती झुंज देत अर्धशतक (54) लगावलं पण संघाला 10 धावांची गरज असताना तो झेलबाद झाला. ज्यानंतर बुमराह, चहल आणि प्रसिद्ध यांना मिळून 10 धावा करता न आल्याने भारत 283 धावाचं करु शकला आणि चार धावांनी भारताने सामना गमावला.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha