न्यूयॉर्क : टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024)  भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील मॅचला पावसामुळं उशिरानं सुरुवात झाली. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या गोलंदाजीपुढं भारताचे दिग्गज फलंदाज ढेपाळले. रिषभ पंत आणि अक्षर पटेल या दोघांशिवाय भारताच्या इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. भारतानं पाकिस्तान समोर 120 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्यानं चांगली गोलंदाजी केली. भारतानं पाकिस्तानला 6 धावांनी पराभूत करत रोमहर्षक विजय मिळवला.



पाकिस्तानकडून बाबर आझमनं 13 धावा केल्या. बाबर आझमला जसप्रीत बुमराहनं बाद केलं. अक्षर पटेलनं भारताला दुसरं यश मिळवून दिलं. उस्मान खान 13 धावा करुन बाद झाला. हार्दिक पांड्यानं भारताला तिसरं यश मिळवून दिलं. फकर झमान 13 धावा करुन बाद झाला. यानंतर जसप्रीत बुमराहनं भारताला चौथं आणि महत्त्वाचं यश मिळवून दिलं.  मोहम्मद रिझवानला जसप्रीत बुमराहनं 31 धावांवर बाद केलं. हार्दिक पांड्यानं शादाब खानला 4 धावांवर बाद केलं.  जसप्रीत बुमरहानं इफ्तिखारला बाद केलं. 


भारताच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला घाम फोडला


भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना अडचणीत आणलं. जसप्रीत बुमराह पाकिस्तानचा तीन विकेट घेतल्या. आणि हार्दिक पांड्यानं पाकिस्तानच्या महत्त्वाच्या विकेट घेतल्या. अक्षर पटेलनं देखील महत्त्वाची विकेट घेतली. अर्शदीप सिंगनं इमाद वसीमला बाद केलं.


 
भारताच्या 119 धावा


भारताच्या डावाची सुरुवात विराट कोहली आणि रोहित शर्मानं केली होती. आज भारताचे अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली फेल ठरले. विराट कोहली 4 धावा करुन बाद झाला. यानंतर भारताला दुसरा धक्का रोहित शर्माच्या रुपात बसला. रोहित शर्मा 13 धावा करुन बाद झाला. रिषभ पंत आणि अक्षर पटेलच्या भागिदारीनं भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. अक्षर पटेलनं 20 केल्या. रिषभ पंतनं केलेल्या 42 धावांच्या जोरावर भारतानं 20 ओव्हरमध्ये 119 धावा केल्या. भारतानं अखेरच्या 30 रनमध्ये  7 विकेट गमावल्या.   


भारताच्या फलंदाजीमध्ये रोहित शर्मा, रिषभ पंत आणि अक्षर पटेल यांच्याशिवाय इतर फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. भारतानं 20 ओव्हरमध्ये 119 धावांपर्यंत मजल मारली.


संबंधित बातम्या :


IND vs PAK : भारत पाकिस्तान लढतीला पावसानं उशीर, बाबरनं टॉस जिंकला, रोहित शर्माची विशेष रणनीती...


T20 World Cup Ind vs Pak: महामुकाबला! टी-20 विश्वचषकात आज भारत अन् पाकिस्तान यांच्यात लढत; सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर