न्यूयॉर्क : टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचला पावसामुळं उशिरानं सुरुवात झाली. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या गोलंदाजीपुढं भारताचे दिग्गज फलंदाज ढेपाळले. रिषभ पंत आणि अक्षर पटेल या दोघांशिवाय भारताच्या इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. भारतानं पाकिस्तान समोर 120 धावांचं आव्हान ठेवलं. 


भारताचे दिग्गज फलंदाज फेल


भारताच्या डावाची सुरुवात विराट कोहली आणि रोहित शर्मानं केली. विराट कोहलीनं चौकार मारल्यानंतर दुसऱ्या बॉलच्या वेळी  बाबर आझमनं गलीमधील खेळाडू पॉईंटवर आणला. यानंतरच्या पुढच्या बॉलवर विराट कोहली पॉइंटच्यावरुन चौकार मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. यानंतर भारताला दुसरा धक्का रोहित शर्माच्या  रुपात बसला. रोहित शर्मा 13 धावा करुन बाद झाला.


रोहित शर्मा बाद झाल्यानंतर अक्षर पटेलला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आलं.  अक्षर पटेल आणि रिषभ पंतनं भारताचा डाव सावरला. अक्षर पटेलनं 20 धावा केल्या. यानंतर तो बाद झाला. अक्षर पटेल बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवनं चौकार मारत डावाची सुरुवात केली. मात्र, तो केवळ 7 धावा करुन बाद झाला. यानंतर भारताच्या विकेट जाण्याची मालिका सुरु झाली. शिवम दुबे देखील मोठी खेळी करु शकला नाही. त्यानंतर रिषभ पंत 42 धावा केल्या. रिषभ पंत मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला.


हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह हे देखील चांगली खेळी करु शकले नाहीत.  भारताचा संघ 119 धावांवर बाद झाला.


पाकिस्तानची दमदार गोलंदाजी 


न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर पहिल्यांदा फलंदाजी करणं आव्हानात्मक असल्याचं यापूर्वीच्या मॅचमध्ये समोर आलं होतं. न्यूयॉर्कमधील या ग्राऊंडवरील खेळपट्टीवर बॉल उशिरानं बॅटवर येत होता. त्यामुळं भारताच्या फलंदाजांचा अंदाज चुकला. रिषभ पंत आणि अक्षर पटेल फलंदाजी करत असताना भारताचा संघ 150 धावांचा टप्पा ओलांडणार असं वाटत असतानाच पाकिस्तानच्या गोलंदाजांनी कमबॅक केलं.  भारताकडून रिषभ पंत, रोहित शर्मा आणि अक्षर पटेल वगळता इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.


पाकिस्तानच्या नसीम शाह आणि हॅरिस राऊफनं प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. मोहम्मद अमीरनं 2 विकेट घेतल्या. तर, शाहीन शाह आफ्रिदीनं 1 विकेट घेतली.


संबंधित बातम्या : 


Virat Kohli : दिग्गजांचा सल्ला डावलणं टीम इंडियाला महागात पडलं, विराट कोहली दुसऱ्यांदा फेल, रोहित शर्मा रणनीती बदलणार?


IND vs PAK : तिसऱ्या बॉलवर सिक्सर, रोहित शर्माने दंड थोपटले, शाहीन आफ्रिदीला अस्मान दाखवलं, पाहा Video