IND vs PAK : विराट-राहुलचा डबल धमाका, कुलदीपचा पंच, पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव
IND vs PAK : भारताने दिलेल्या 357 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ फक्त 128 धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला.
IND vs PAK : विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या दमदार शतकी खेळीनंतर कुलदीप यादव याने भेदक गोलंदाजी केली. भारताने दिलेल्या 357 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ फक्त 128 धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला. कुलदीप यादव याने पाकिस्तानच्या पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. कुलदीप यादव याने फखर जमान, आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अशरफ यांना बाद केले. तर इमाम उल हक याला बुमराहने बाद केले. हार्दिक पांड्याने बाबर आझमला तंबूत पाठवले. शार्दूल ठाकूर याने मोहम्मद रिझवानचा अडथळा दूर केला.
पाकिस्तानने आघाडीच्या चार विकेट झटपट गमावल्या. बाबर आझम, इमाम उल हक, फकार जमान यांना मोठी खेळी करता आली नाही. भारताने दिलेल्या 357 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. सलामी फलंदाज इमाम उल हक स्वस्तात बाद झाला. अवघ्या 17 धावांवर पाकिस्तानला पहिला धक्का बसला. त्यानंतर 43 धावसंख्येवर दुसरा धक्का बसला. बाबर आझम याला हार्दिक पांड्याने स्वस्तात तंबूत पाठवले. तर इमामचा अडथळा बुमराहने दूर केला.
तब्बल 357 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचे आघाडीचे फलंदाज ढेपाळले. बुमराह आणि हार्दिक पांड्याने भेदक मारा करत पाकिस्तानच्या स्टार फंलदाजांना तंबूत पाठवले. त्यानंतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानकडून एक फलंदाज 30 धावसंख्या ओलांडू शकला नाही. फखर जमान याने सर्वाधिक 27 धावांची खेळी केली. त्याशिवाय आगा सलमान आणि इफ्तिखार अहमद यांनी प्रत्येकी 23 धावांची खेळी केली. बाबर आझम याने 10 धावा केल्या. इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नाही. हॅरिस रौफ आणि नसीम शाह दुखापतग्रस्त असल्यामुळे फलंदाजीला आले नाहीत. पाकिस्तान संघाने 32 षटकात 8 बाद 128 धावा केल्या.
विराट-राहुलची अभेद्य भागिदारी
रोहित शर्माच्या भारतीय संघानं आशिया चषकातल्या सुपर फोर सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी ५० षटकांत ३५७ धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. भारताच्या विराट कोहली आणि लोकेश राहुल या आदल्या दिवशीच्या दोन्ही नाबाद फलंदाजांनी शतकं झळकावली. त्यामुळं भारतानं २४ षटकं आणि एका चेंडूतल्या दोन बाद १४७ धावांवरून ५० षटकात दोन बाद ३५६ धावांचा डोंगर उभारला. विराट कोहलीनं वन डे कारकीर्दीतलं सत्तेचाळीसावं, तर लोकेश राहुलनं वन डे कारकीर्दीतलं सहावं शतक झळकावलं. विराटनं वन डे कारकीर्दीतला १३ हजार धावांचा टप्पाही पार केला. त्यानं ९४ चेंडूंत नाबाद १२२ धावांची खेळी उभारली. लोकेश राहुलनं १०६ चेंडूंत नाबाद १११ धावांची खेळी केली. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २३३ धावांची अभेद्य भागीदारी रचली.