(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी20 मध्ये चहलला खास रेकॉर्ड करण्याची संधी, दिग्गज फिरकीपटूंना टाकू शकतो मागे
India vs New Zealand: अहमदाबादमध्ये टी20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना खेळवला जाणार आहे. ज्यात फिरकीपटू युजवेंद्र चहल एक खास रेकॉर्ड करु शकतो.
India vs New Zealand T20 : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण सामना जिंकणारा संघ मालिकेवर कब्जा करेल. टीम इंडियाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलसाठी (Yuzvendra Chahal) हा तिसरा टी-20 सामना आणखी खास असेल. या सामन्यात तो एक खास कामगिरी करून एक दमदार रेकॉर्ड नावावर करु शकतो. तिसऱ्या टी-20 मध्ये त्याने तीन विकेट घेतल्यास तो मिचेल सँटनर आणि आदिल रशीद अशा दिग्गज फिरकीपटूंना मागे टाकेल.
युझवेंद्र चहलने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 91 विकेट घेतल्या आहेत. त्याने 75 सामन्यांच्या 74 डावांमध्ये गोलंदाजी करताना हा विक्रम केला आहे. तो मिचेल सँटनरचा टी-20 मध्ये विकेट्सचा विक्रम मोडण्यापासून फक्त एक विकेट दूर आहे. सँटनरने आंतरराष्ट्रीय टी-20मध्येही 91 विकेट घेतल्या आहेत. अहमदाबाद टी-20 मध्ये युझवेंद्र चहलने तीन विकेट घेतल्यास तो इंग्लंडच्या आदिल रशीदला मागे टाकेल. आदिल रशीदच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 93 विकेट्स आहेत. लखनौ येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने अत्यंत दमदार गोलंदाजी केली आणि दोन षटकात चार धावा देऊन एक बळी घेतला.
दोन्ही संघासाठी महत्त्वाचा सामना
अहमदाबादमध्ये बुधवारी होणारा हा सामना दोन्ही संघांसाठी करो किंवा मरो असा आहे. हा सामना जिंकून न्यूझीलंड संघाला दुसऱ्यांदा भारतीय भूमीवर टी-20 मालिका जिंकायची आहे. किवी संघाने 2012 साली भारतीय भूमीवर शेवटची टी-20 मालिका जिंकली होती. किवींनी टीम इंडियाचा 1-0 असा पराभव केला होता. दुसरीकडे, जर टीम इंडिया तिसरा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला, तर ती आपल्या भूमीवर सलग तिसऱ्यांदा टी-20 मालिका जिंकेल. भारताने याआधी 2017 आणि 2021 मध्ये न्यूझीलंडला त्याच्या भूमीवर टी-20 मालिकेत पराभूत केलं आहे.
भारताच्या अंतिम 11 मध्ये बदल होणार?
भारताने न्यूझीलंडविरुद्ध सुरुवातीच्या दोन्ही टी20 सामन्यात शॉ ऐवजी एकदिवसीय सामन्यांमध्ये सतत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलला पसंती दिली होती. मात्र, गिल या फॉरमॅटमध्ये चमत्कार करू शकलेला नाही. या मालिकेतील दोन सामन्यांमध्ये गिलने केवळ 9 च्या सरासरीने 18 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, ईशान किशनची बॅटही शांत झाली आहे. किशनने या मालिकेत आतापर्यंत 11.50 च्या सरासरीने 23 धावा केल्या आहेत. तसंच या मालिकेसाठी पहिल्यांदाच यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माचा टीम इंडियात समावेश करण्यात आला. अशा स्थितीत निर्णायक सामन्यात हार्दिक जितेशला अंतिम 11 मध्ये स्थान देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय उमरान मलिक नरेंद्र मोदी स्टेडियमवर संघात परतणार की नाही, हेही पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या निर्णायक सामन्यात कॅप्टन हार्दिक कोणा-कोणाला संधी देतो हे पाहावं लागेल.
संभाव्य भारतीय संघ- हार्दिक पांड्या (कर्णधार), पृथ्वी शॉ, ईशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, शिवम मावी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग
हे देखील वाचा-