WC 2023 Semi-Final: न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडिया सेमीफायनलमध्ये जाणार?, पाहा नेमकं समीकरण
NZ vs IND: भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ आतापर्यंत अजेय आहेत. दोन्ही संघाने आपल्या पहिल्या चार सामन्यात विजय मिळवला आहे. रविवारी या दोन संघामध्ये सामना होत आहे.
IND vs NZ, World Cup 2023 : रविवारी विश्वचषकात भारताचा सामना न्यूझीलंडसोबत (IND vs NZ) होणार आहे. 22 ऑक्टोबर रोजी धर्मशालाच्या मैदानावर (dharamshala stadium) हे दोन्ही संघ भिडणार आहेत. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी नाणेफेक होणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. कारण, विजेता संघ सेमीफायनलमध्ये पोहचणार आहे. यंजाच्या विश्वचषकात (Odi World Cup) भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ आतापर्यंत अजेय आहेत. दोन्ही संघाने आपल्या पहिल्या चार सामन्यात विजय मिळवला आहे. रविवारी या दोन संघामध्ये सामना होत आहे. म्हणजेच एका संघाचा विजयरथ थांबणार आहे. जिंकणारा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान होईल. सध्या दोन्ही संघाचे समान गुण आहेत, पण रनरेट सरस असल्यामुळे न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानावर आहे.
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाने आतापर्यंत शानदार प्रदर्शन केले आहे. दोन्ही संघाने सर्व सामने एकतर्फी जिंकले आहेत. सध्याच्या घडीला या दोन्ही संघाच्या तुलनेत दुसरा संघ कुठेही दिसत नाही. अशा परिस्थितीत जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने येतील तेव्हा या विश्वचषकातील हा आतापर्यंतचा सर्वात रोमांचक सामना होऊ शकतो. पण गेल्या 20 वर्षांत टीम इंडियाला आयसीसीच्या एकाही स्पर्धेत न्यूझीलंडला हरवता आलेले नाही. हेही तितकेच खरं आहे.
भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ सध्या बलाढ्य आहेत. आतापर्यंत हे दोन्ही संघ अजेय राहिलेत. रविवारी जो संघ बाजी मारेल तो उपांत्य फेरीचे तिकीट जवळपास निश्चित करेल. कारण या विश्वचषकात सहभागी होणाऱ्या 10 संघांना राउंड रॉबिन सामन्यांमध्ये 9-9 सामने खेळायचे आहेत. याआधीचा इतिहास पाहिला तर 5 किंवा 6 सामने जिंकणारा संघ उपांत्य फेरीत पोहचला आहे. त्याशिवाय या दोन्ही संघाचा नेट रनरेटही सर्वोत्तम आहे. अशा परिस्थितीत रविवारचा सामना जिंकून उपांत्य फेरीचे तिकीट जवळपास निश्चित करण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरतील.
टीम इंडिया सेमीफायनलचे तिकिट कसे पक्के करणार ?
भारतीय संघाने आतापर्यंत शानदार कामगिरी करत विजयाचा चौकार लावला आहे. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशचा पराभव करत भारताने आठ गुणांची कमाई केली आहे. रविवारी होणाऱ्या सामन्यातही किवीचा पराभव केला तर भारतीय संघाचे पाच विजय होतील. त्यानंतर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, नेदरलँड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेचे आव्हान असेल. येथे इंग्लंड मजबूत संघ आहे पण नेदरलँड आणि श्रीलंकेला पराभूत करणे टीम इंडियाला जड जाणार नाही. अशा परिस्थितीत भारतीय संघ इंग्लंडकडून हरला तरी श्रीलंका आणि नेदरलँड्सला पराभूत करून टॉप-4 मध्ये सहज प्रवेश करू शकतो.
हेड टू हेड आकडे काय सांगतात ?
विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड संघामध्ये आतापर्यंत नऊ सामने झाले आहेत. यामध्ये न्यूझीलंड संघाने पाच सामन्यात बाजी मारली आहे. तर भारताला फक्त तीन सामने जिंकता आले. एका सामन्याचा निकाल लागल नव्हता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला सामना 1975 च्या विश्वचषकात झाला होता. तर अखेरचा सामना 2019 मध्ये झाला होता. त्यामध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला होता. भारताने विश्वचषकात न्यूझीलंडला अखेरचे 2003 मध्ये पराभूत केले होते.
वनडेतील आकडेवारी काय -
वनडे क्रिकेटमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यंत 116 सामने झाले आहेत. त्यामध्ये भारताने 58 सामन्यात विजय मिळवला आहे तर न्यूझीलंडला 50 सामन्यात विजय मिळाला आहे. सात सामन्याचा निकाल लागला नाही. आता रविवारी होणाऱ्या सामन्यात कोण बाजी मारणार ? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय.