(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs NZ : निर्णायक सामना खेळण्यासाठी भारतीय संघ पोहोचला अहमदाबादला, खासप्रकारे झालं स्वागत, पाहा VIDEO
Team India Video : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ अहमदाबादला पोहोचला आहे.
India vs New Zealand T20 : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील दोन सामने खेळले गेले आहेत. यामध्ये दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. आता या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ अहमदाबादला पोहोचला आहे. टीम अहमदाबादला पोहोचल्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “हॅलो अहमदाबाद. भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यासाठी आम्ही येथे आहोत." मालिकेतील तिसरा सामना बुधवार, 1 फेब्रुवारी रोजी खेळवला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.00 वाजता सुरू होईल. अहमदाबादला पोहोचल्यानंतर, भारतीय संघाचे अतिशय खास पद्धतीने स्वागत करण्यात आले.
बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सर्व खेळाडू आधी बसमधून उतरतात. दरम्यान, प्रशिक्षक राहुल द्रविड सलामीवीर फलंदाज शुभमन गिलच्या गळ्यात हात घालताना दिसत आहेत. यानंतर, संपूर्ण क्रीडा कर्मचार्यांसह भारतीय संघ हॉटेलच्या आत जातो, जिथे सर्व खेळाडूंचे गळ्यात शाल घालून स्वागत केले जाते. यामध्ये प्रथम प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या गळ्यात शाल घातली जाते. मग संघातील उर्वरित खेळाडूंचेही त्याच पद्धतीने स्वागत केले जाते.
पाहा VIDEO-
Hello Ahmedabad 👋
— BCCI (@BCCI) January 30, 2023
We are here for the third & final T20I of the #INDvNZ series 👏 👏#TeamIndia pic.twitter.com/gQ1jPEnPvK
करो किंवा मरोचा सामना
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल. हा सामना जिंकून कोणताही संघ मालिका जिंकेल. याआधी मालिकेतील दुसरा सामना लखनौमध्ये खेळवण्यात आला होता, ज्यामध्ये भारतीय संघाने 8 विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्याचवेळी रांचीमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 21 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
पृथ्वी शॉला मिळू शकते संधी
भारताने न्यूझीलंडविरुद्ध सुरुवातीच्या दोन्ही टी20 सामन्यात शॉ ऐवजी एकदिवसीय सामन्यांमध्ये सतत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलला पसंती दिली होती. मात्र, गिल या फॉरमॅटमध्ये चमत्कार करू शकलेला नाही. या मालिकेतील दोन सामन्यांमध्ये गिलने केवळ 9 च्या सरासरीने 18 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, ईशान किशनची बॅटही शांत झाली आहे. किशनने या मालिकेत आतापर्यंत 11.50 च्या सरासरीने 23 धावा केल्या आहेत. तसंच या मालिकेसाठी पहिल्यांदाच यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माचा टीम इंडियात समावेश करण्यात आला. अशा स्थितीत निर्णायक सामन्यात हार्दिक जितेशला अंतिम 11 मध्ये स्थान देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय उमरान मलिक नरेंद्र मोदी स्टेडियमवर संघात परतणार की नाही, हेही पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या निर्णायक सामन्यात कॅप्टन हार्दिक कोणा-कोणाला संधी देतो हे पाहावं लागेल.
संभाव्य भारतीय संघ- हार्दिक पांड्या (कर्णधार), पृथ्वी शॉ, ईशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, शिवम मावी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग
हे देखील वाचा-