Rinku Singh T20 Debut : रिंकूचं भारतीय संघात पदार्पण, पाहा फिनिशरचा धगधगता प्रवास
Rinku Singh T20 Debut : आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंह याचे भारतीय संघात पदार्पण झालेय.
Rinku Singh T20 Debut : आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंह याचे भारतीय संघात पदार्पण झालेय. रिंकू सिंह याला जसप्रीत बुमराह याने कॅप दिली. रिंकू सिंह याच्यासोबत प्रसिद्ध कृष्णा यानेही टी 20 मध्ये पदार्पण केलेय. रिंकू सिंह याचा भारतीय संघात पोहचण्याचा प्रवास सोप्पा नाही. वडिलांचा क्रिकेटला विरोध होता. वेळप्रसंगी कोचिंग सेंटरवर लादी पुसण्याची नोकरीही केली. आयपीएलमध्ये सलग पाच षटकार मारुन कोलकात्याला विजय मिळवून दिल्यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला.
रिंकू सिंह हा उत्तर प्रदेशच्या अलिगढचा. तिथेच त्याचं कुटुंब राहतं. रिंकूचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 रोजी झाला. 5 भावंडांमध्ये रिंकू हे तिसरं अपत्य. रिंकूच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे ते गॅस सिलेंडर डिलिव्हरीचं काम करायचे. तिकडे रिंकूला शाळेत असल्यापासूनच क्रिकेटची तुफान आवड होती. ज्यावेळी टीव्हीवर मॅच लागलेली असायची, त्यावेळी रिंकू टीव्हीसमोरुन हटत नव्हता. क्रिकेटवर त्याचं केवळ प्रेम नव्हतं तर क्रिकेट हे त्याचं वेड होतं. शाळेत असल्यापासूनच तो क्रिकेट खेळतो. तेव्हापासून 'धुलाई' हे त्याचं नियमित काम आहे. समोर कोणताही बोलर असो, त्याने फेकलेला यॉर्कर असो वा बाऊन्सर, त्याला सीमापार पोहोचवण्यासाठी रिंकू प्रसिद्ध होता.
क्रिकेटला वडिलांचा विरोध
जसं आपल्याकडे टेनिस बॉल किंवा प्लास्टिक बॉलने क्रिकेट खेळणाऱ्यांना कधी ना कधी घरच्यांकडून धपाटे पडतात, तसंच रिंकूनेही क्रिकेटच्या वेडापाई घरच्यांचा अनेकवेळा मार खाल्लाय. रिंकू सतत क्रिकेट खेळत असल्यामुळे त्याचे वडील भलतेच चिडायचे. रिंकूने याबाबत म्हटलंय, "मी क्रिकेट खेळू नये असं माझ्या वडिलांना वाटायचं. क्रिकेटमध्ये माझा वेळ बरबाद व्हावा अशी त्यांची अजिबात इच्छा नव्हती. कधीकधी मला मारही खावा लागायचा. खेळून मी घरी आलो की घरी माझी धुलाई व्हायची. मला क्रिकेट खूप आवडायचं, त्यामुळे माझ्या भावांनी मला साथ दिली. मला त्यावेळी बॉल खरेदी करायलाही पैसे नसायचे, मग बॅटचं स्वप्न तर लांबची गोष्ट होती. मात्र काही लोकांनी त्यासाठी मला मदत केली"
दिल्लीत खेळवण्यात आलेल्या एका स्पर्धेत रिंकूला बक्षीस म्हणून बाईक मिळाली होती. ती बाईक त्याने वडिलांना दिली. त्यामुळे वडिलांना जरी आनंद झाला असला तरीही कुटुंबाची आर्थिक स्थिती जशीच्या तशी होती. त्यामुळे रिंकूने पूर्णपणे क्रिकेटकडे न वळता पोटापाण्यासाठी काही करावं अशीच त्यांची इच्छा होती.
कोचिंग सेंटरवर लादी पुसण्याची नोकरी
रिंकूचा संघर्ष केवळ बॅट आणि बॉल इतका मर्यादित नव्हता. रिंकूने आपल्या वयाच्या विविध टप्प्यांवर खूप संघर्ष केला आहे. त्याने एका कोचिंग सेंटरवर लादी (फरशी) पुसण्याचं कामही केलं आहे. त्याच्यासाठी ती नोकरी होती. "एका कोचिंग सेंटरवर मला लादी पुसण्याची नोकरी मिळाली होती. सकाळी-सकाळी जाऊन लादी पुसावी लागायची. माझ्या भावानेच मला ही नोकरी मिळवून दिली होती. मी ही नोकरी करु शकलो नाही. काही दिवसात ही नोकरी सोडून दिली. मी अभ्यासातही तितका हुशार नव्हतो. त्यामुळे क्रिकेट हेच माझं ध्येय होतं. मला क्रिकेटच पुढे घेऊन जाऊ शकतं हे मी मनोमन ठरवलं. माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धगधगती कारकीर्द
रिंकू सिंहची फर्स्ट क्लास (प्रथम श्रेणी) क्रिकेटची कारकीर्द तितकीच धगधगती आहे. त्याने आतापर्यंत 40 फर्स्ट क्लास, 50 लिस्ट ए आणि 78 टी 20 सामने खेळले आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने सात शतकं आणि 19 अर्धशतकं ठोकली आहेत. नाबाद 163 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. याशिवाय लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 53 च्या सरासरीने 1749 धावा कुटल्या आहेत. तर टी 20 सामन्यात रिंकूने 6 अर्धशतकांच्या जोरावर 1392 धावा चोपल्या आहेत.