राजकोट : दंगल चित्रपटातील आमीर खानचा डायलॉग सिद्ध करुन दाखवत महिला टीम इंडियाने (Team india) आज डोळे दिपवणारी कामगिरी केलीय. म्हारी छोरियाँ छोरों से कम है कै.. भारत विरुद्ध आयर्लँड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने तब्बल 304 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3-0 ने मालिका विजयही मिळवला. कर्णधार स्मृती मंधानाच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने आज नादखुळा फलंदाजी व गोलंदाजी केली. मैदानातील प्रेक्षकांचे पैसे वसुल खेळ करत भारतीय महिला संघाने चक दे इंडिया म्हणत जल्लोष केला. चौकार, षटकारांची आतिषबाजी करत स्मृती मंधाना आणि प्रतिका रावलच्या खेळाने क्रिकेट चाहत्यांची मने जिकंली. त्यामुळेच, टीम इंडियाला 304 धावांनी मोठा विजय मिळवता आला. या विजयानंतर संघातील खेळाडूंनी जल्लोष साजरा केल्याचा व्हिडिओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे. तर, सोशल मीडियातून टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
राजकोटमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने आज ऐतिहासिक कामगिरी करत जगातील क्रिकेट रसिकांचे लक्ष आपल्याकडे वेधले. जगाच्या महिला क्रिकेटमध्ये यापूर्वी कधीही घडला नव्हता असा खेळ आज राजकोटच्या मैदानावर पाहायला मिळाला. तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या व अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने सर्वोच्च धावसंख्या करून इतिहास रचला. स्मृती मानधना आणि प्रतिका रावल या सलामी जोडीच्या शतकांमुळे भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेटमध्ये 400 पेक्षा जास्त धावांचा डोंगर रचला होता. यापूर्वी महिला क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या 370 होती, तीही याच मालिकेतील 12 जानेवारी 2025 च्या सामन्यात केली होती. मात्र, अंतिम सामन्यात आपलाच रेकॉर्ड मोडत महिला संघाने 50 षटकांत 435 धावांचा डोंगर रचला.
कर्णधार मंधानाने 80 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकारांसह 135 धावा केल्या, तर प्रतिका रावलने 154 धावा ठोकल्या, विशेष म्हणजे तिचा हा 6 वाच एकदिवसीय सामना आहे. या दोन्ही धडाकेबाज फलंदाजांच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 435 धावांचा डोंगर उभारला. मात्र, भारताच्या 435 धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ अवघ्या 131 धावांवर तंबूत परतला. 31.4 षटकांतच आयर्लंडचे सर्व फलंदाज बाद झाले. त्यामुळे, भारतीय संघाला 304 धावांनी मोठा विजय मिळाला. दरम्यान, तीन सामन्यांच्या मालिकेतील दमदार कामगिरीमुळे प्रतिका रावलला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर, आजच्या सामन्यातील तडाखेबंद 154 धावांसाठी तिला वुमेन ऑफ द मॅच पुरस्कारही देण्यात आला.