(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND Vs ENG Women : इंग्लंडने मालिका जिंकली, टीम इंडियाला क्लिन स्वीप टाळण्याची संधी
इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीत बर्यापैकी सुधारणा झाली आहे. पण पुन्हा खराब फलंदाजीमुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.
IND Vs ENG Women : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज होईल. यापूर्वी इंग्लंडने दोन्ही सामने जिंकून मालिका जिंकली आहे. तथापि, तिसरा एकदिवसीय सामना जिंकून भारताला क्लिन स्वीप टाळण्याची संधी आहे. तिसर्या एकदिवसीय सामन्यापूर्वी उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेली कर्णधार मिताली राज तंदुरुस्त आहे, ही भारतासाठी दिलासादायक बाब आहे. परंतु उपकर्णधार हरमनप्रीत कौरकडून भारताला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
भारतीय महिला संघाची शेवटच्या काही एकदिवसीय सामन्यांमध्ये कामगिरी निराशाजनक राहिली आहे. मिताली राज हिच्या नेतृत्वाखालील संघाने मागील 7 एकदिवसीय सामन्यांपैकी 6 सामने गमावले आहेत. त्यामुळे संघाला पुन्हा फॉर्ममध्ये येणे आवश्यक आहे. घरच्या मैदानावर भारताला दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाकडून पराभव पत्करावा लागला होता.
इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीत बर्यापैकी सुधारणा झाली आहे. पण पुन्हा खराब फलंदाजीमुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. वारंवार पटापट पडणाऱ्या विकेटमुळे कर्णधार मितालीवर दडपण वाढत आहे. यामुळे तिच्या खेळावरही परिणाम होत आहे.
हरमनप्रीतच्या खराब फॉर्ममुळे चिंता आणखी वाढली
संघासाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे उपकर्णधार हरमनप्रीत कौरची खराब फलंदाजी. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2017 वर्ल्ड कपमध्ये 171 धावांच्या शानदार खेळीनंतर तिला केवळ दोन सामन्यांत अर्धशतकं ठोकता आलं आहे. यादरम्यान, तिला 28 सामन्यात 22 वेळा फलंदाजीची संधी मिळाली.
मिताली आणि जेमिमा रॉड्रिग्स व्यतिरिक्त पूनम राऊत, दीप्ती शर्मा आणि तानिया भाटियामध्ये मोठे शॉट्स खेळण्याची क्षमता नाही. या कारणास्तव सलामीवीर स्मृती मंधाना आणि 17 वर्षीय शेफाली वर्मा यांच्यावर खूप दबाव आहे. दुसर्या वनडे सामन्यात शेफालीने 55 चेंडूत 44 धावा करून संघाला चांगली सुरुवात मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण मधल्या षटकांत कोणताही खेळाडू जलद धावा करु शकली नाही. दुसरीकडे इंग्लंडने गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही विभागात शानदार कामगिरी केली आहे. टॅमी ब्यूमॉन्ट आणि सायव्हर चांगल्या फॉर्मात आहेत.
संभाव्य संघ
भारत : मिताली राज (कर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, पूनम राऊत, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (विकेटकीपर), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, जेमिमा रॉड्रिग्ज, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकर , एकता बिष्ट, राधा यादव, पूनम यादव, प्रिया पूनिया, इंद्राणी रॉय (विकेटकीपर).
इंग्लंडः हीथर नाइट (कर्णधार), टॅमी ब्यूमॉन्ट, केट क्रॉस, नॅट सायव्हर, सोफिया डन्कले, लॉरेन विनफिल्ड-हिल, अन्या श्रबसोले, कॅथरीन ब्रंट, सोफी एक्लेस्टोन, अॅमी जोन्स (विकेटकीपर), फ्रेया डेव्हिस, टॅश फारंट, सराह ग्लेन, मॅडी विलिअर्स, फ्रॅन विल्सन, एमिली अरलोट.