(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs ENG: विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 23,000 धावा करणारा फलंदाज बनला; धोनीचा 'हा' विक्रमही मोडला
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी कोहलीने आपल्या नावावर एक विक्रम केलाय. विराटने कारकिर्दीच्या 490 व्या डावात हा टप्पा गाठला. याशिवाय कोहलीने धोनीचा विक्रमही मोडला.
England vs India Oval Test: लंडनमधील द ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीत भारतीय कर्णधार विराट कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. ओव्हलवर खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीत कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 23,000 धावा करणारा फलंदाज बनला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी कोहलीने आपल्या कारकिर्दीच्या 490 व्या डावात हा टप्पा गाठला. भारतीय कर्णधाराला ओली रॉबिन्सनने 50 च्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद केले, जे कसोटी क्रिकेटमधील त्याचे 27 वे अर्धशतक होते.
सचिन तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 34,357 धावा आहेत. त्याच्या पाठोपाठ कुमार संगकारा (28,016 धावा) आणि रिकी पाँटिंग (27,483 धावा) आहेत. या यादीत कोहली सातव्या क्रमांकावर आहे तर राहुल द्रविड (24,208 धावा) सहाव्या क्रमांकावर आहे.
32 वर्षीय विराटने तीनही फॉरमॅटमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने 96 कसोटीत 13,646 धावा केल्या आहेत, तर त्याने 254 एकदिवसीय सामन्यांमध्ये 13,061 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 89 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2,272 धावा केल्या आहेत.
धोनीचा विक्रम मोडला
ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात अर्धशतक झळकावताच विराट कोहली इंग्लंडच्या भूमीवर कर्णधार म्हणून 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. त्याने या विक्रमामध्ये एमएस धोनीला मागे टाकले.
विराट कोहलीने कर्णधार म्हणून सातव्यांदा इंग्लंडच्या भूमीवर 50 किंवा त्याहून अधिक धावांची खेळी केली आहे. त्याचबरोबर धोनीने हा पराक्रम केवळ सहा वेळा केला. इंग्लंडमध्ये हा पराक्रम करण्याच्या बाबतीत सौरव गांगुली तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने हे 4 वेळा केले.