Ravichandran Ashwin : इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG 4th Test) मालिकेतील चौथ्या सामन्यात रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) फिरकीच्या जोरावर आणखी विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने दिग्गज माजी फिरकीपटू अनिल कुंबळेंचा (Anil Kumble) विक्रम मोडीत काढलाय. अश्विनने लागोपाठ दोन विकेट्स पटकावत इंग्लंडला मोठे धक्के दिले आहेत. पहिल्या डावात इंग्लंडने 46 धावांची आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यास सुरुवात केली. बेन डकेट आणि जॅक फ्राऊली चांगले सेट झालेले असतानाच अश्विनने पाचव्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर दोन विकेट्स पटकावल्या.
लागोपाठ दोन विकेट्स पटकावत नव्या विक्रमाला गवसणी
अश्विनने पहिल्यांदा बेन डकेटची विकेट पटकावली. सरफराज खान बेन डकेटचा झेल अतिशय उत्तमरित्या पकडला. त्यानंतर अश्विनने दुसऱ्या चेंडूवर ओली पोपला तंबूत धाडले. अश्विनने पोपला भोपळाही फोडू दिला नाही. ओली पोप भोपळाही न फोडता तंबूत परतला. दरम्यान, अश्विनने त्याच्या फिरकीची कमाल दाखवत 19 धावा देत दोन विकेट्स पटकावल्या.
अनिल कुंबळेंचा विक्रम मोडीत
लागोपाठ दोन चेंडूमध्ये दोन विकेट्स पटकावत अश्विनने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. अश्विनने भारतात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या दिग्गज अनिल कुंबळेंचा विक्रम मोडीत काढलाय. ओली पोपला तंबूत धाडल्यानंतर अश्विनच्या भारतात कसोटी क्रिकेटमध्ये 351 विकेट्स झाल्या आहेत. आता अनिल कुंबळेंचा 350 विकेट्स विक्रम दुसऱ्या स्थानावर गेला आहे.
हरभजन तिसऱ्या क्रमांकावर
भारतात सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत हरभजन सिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारतात 265 विकेट्स पटकावल्या आहेत. तर कपिल देव यांनी भारतात 219 विकेट्स पटकावल्या होत्या. कपिल देव या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय रवींद्र जाडेजा 210 विकेट्स पटकावत 5 व्या क्रमांकावर आहे.
दोन देशांविरोधात 100 पेक्षा जास्त विकेट्स
रवीचंद्रन अश्विन भारताच्या पहिला गोलंदाज आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये दोन देशांविरोधात 100 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स पटकावल्या आहेत. अश्विनने हा कारनामा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध करुन दाखवलाय. दरम्यान, अनिल कुंबळेंचा विक्रम मोडित काढल्यानंतर अश्विनवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या