IND vs ENG: 'या' त्रिकूटापासून टीम इंडियाला राहावं लागेल सावध, अन्यथा रोहितसेनेचं स्वप्न पुन्हा भंगण्याची शक्यता
India vs England : टी20 विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामन्यात आज भारत आणि इंग्लंडचा आमना सामना होणार आहे. आज दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानचा पराभव करत फायनलचे तिकिट मिळवलेय. आता दुसरा संघ कोणता? याचं उत्तर आज मिळणार आहे.
3 Players Who Watch Out For England : टी20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानचा दारुण पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. आता दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंड आणि भारतीय संघ फायनलच्या तिकिटासाठी भिडणार आहेत. दक्षिण आफ्रिकासोबत शनिवारी फायनल कोण खेळणार? याचं उत्तर आज मिळणार आहे. त्यासाठी भारत आणि इंग्लंडचे संघ भिडणार आहेत.
गयानामध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा उपांत्य सामना होणार आहे. या सामन्यात भारताला 2022 सालच्या टी20 विश्वचषकात इंग्लंडकडून झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी मिळेल. 2022 सालच्या टी20 विश्वचषकातही भारत आणि इंग्लंड संघ उपांत्य फेरीत आमनेसामने आले होते. अॅडलेडमधल्या त्या सामन्यात इंग्लंडनं भारताचा 10 विकेट्सनी धुव्वा उडवला होता. रोहित शर्माच्या भारतीय संघानं त्या पराभवाची परतफेड करून यंदाच्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारावी अशी अपेक्षा भारतीय क्रिकेटरसिक करत आहेत. पण या सामन्यात रोहित अॅण्ड कंपनीला इंग्लंडच्या त्रिकूटापासून सावध राहावं लागेल, अन्यथा भारताचे स्वप्न पुन्हा एकदा भंगण्याची शक्यता आहे.
1- जोस बटलर
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर सध्या भन्नाट फॉर्मात आहे. टी20 विश्वचषकात जोस बटलर यानं विस्फोटक फलंदाजी केली. त्यानं 160 च्या स्ट्राईक रेटने 191 धावांचा पाऊस पाडलाय. जोस बटलरच्या बॅटमधून आतापर्यंत 18 चौकार आणि 10 षटकार ठोकले आहेत.2022 टी20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताविरोधात जोस बटलरने मॅच विनिंग खेळी केली होती. आज जोस बटलरला टीम इंडियाला रोखावं लागेल.
2- फिल साल्ट
जोस बटलरचा सलामीचा जोडीदार फिल सॉल्टही दमदार फॉर्मात आहे. सॉल्ट पॉवरप्लेमध्ये विस्फोटक फलंदाजीनं प्रतिस्पर्धी संघाला सळो की पळो करुन सोडतो. त्यामुळे त्याला लवकरच रोखण्याचं आव्हान टीम इंडियाच्या गोलंदाजासमोर असेल. आयपीएल 2024 मध्ये सॉल्टने आक्रमक फंलदाजीने सर्वांचं लक्ष वेधले होते. 2024 च्या विश्वचषकातही सॉल्ट भन्नाट फॉर्मात आहे. सॉल्टने या विश्वचषकात 167 च्या स्ट्राईक रेटने 183 धावांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 16 चौकार आणि 10 षटकार निघाले आहेत.
3- सॅम करन
अष्टपैलू सॅम करन गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये भारतासाठी विलन ठरु शकतो. सॅम करन कोणत्याही क्षणी विकेट घेण्याची क्षमता आहे. मधल्या षटकात तो भेदक मारा करतो. त्याशिवाय फलंदाजी करताना वेगानं धावा जमवण्याचं त्याचं कौशल्य आहे. अखेरच्या षटकात तो चौकार षटकारांचा पाऊस पाडतो. त्यामुळे सॅम करनला रोखण्याचं आव्हान भारतीय संघापुढे असेल.