India T20I Squad for England Series 2025 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी संघ जाहीर केला. भारतीय निवड समितीच्या बैठकीतील सर्वात मोठी बातमी म्हणजे मोहम्मद शमीचे पुनरागमन झाले आहे. तसेच, बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पर्थ आणि सिडनी कसोटीत भारताचे नेतृत्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय, मोठी बातमी म्हणजे हार्दिक पांड्याला उपकर्णधार बनवण्यात आले नाही.






अक्षर पटेल उपकर्णधार 


निवडकर्त्यांनी संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवली आहे आणि युवा अष्टपैलू अक्षर पटेलला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. अक्षर पहिल्यांदाच या भूमिकेत दिसणार आहे. हार्दिक पांड्या संघात आहे, पण त्याला जबाबदारीपासून मुक्त ठेवण्यात आले आहे. पण, पांड्याची संघातील उपस्थिती हे सिद्ध करते की व्यवस्थापनाचा अजूनही त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. दक्षिण आफ्रिका टी-20 दौऱ्यातही पांड्या संघाचा भाग होता.


गेल्या काही वर्षांत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अक्षर पटेलने टीम इंडियासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला जिंकून देण्यात अक्षर पटेलने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये 16.30 च्या सरासरीने एकूण 20 विकेट्स घेतल्या. आता निवडकर्त्यांनी त्याच्या कामगिरीचे बक्षीस त्याला दिले आहे. अक्षर इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार हे निश्चित आहे. 


शमीचे पुनरागमन, हर्षित राणाला आणखी एक संधी


युवा खेळाडू अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी आणि ध्रुव जुरेल यांनी संघात आपले स्थान कायम ठेवले आहे. हर्षित राणा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 संघातही होता, पण तो अंतिम अकरा जणांमध्ये स्थान मिळवू शकला नाही. राणा यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. मेन इन ब्लू संघात शमीचा समावेश हा चर्चेचा मुख्य विषय असेल. 34 वर्षीय वेगवान गोलंदाज 2023 नंतर पहिल्यांदाच टीम इंडियाची जर्सी घालणार आहे.






शमीने देशांतर्गत क्रिकेट खेळत संघात केले शानदार पुनरागमन


बंगालकडून स्थानिक क्रिकेटमध्ये परतला. तो जवळजवळ एक वर्ष मैदानाबाहेर राहिला. शमी विजय हजारे ट्रॉफीसाठी बंगाल संघाचाही भाग होता. शमीने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले. त्याने शेवटचा 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत भाग घेतला होता. शस्त्रक्रियेतून आणि अनेक दुखापतींमधून बरे झाल्यानंतर तो नोव्हेंबरमध्ये मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात बंगालकडून मैदानात परतला, जिथे त्याने 7 विकेट्स घेतल्या.


इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग. , मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).


हे ही वाचा -


Ind vs Eng T20 Squad : ह्यांचं नक्की चुकलं तरी काय BCCI... इंग्लंडविरुद्ध संघ निवडण्यात झाली मोठी चूक? 6 खेळाडूंचा केला करेक्ट कार्यक्रम