India T20I Squad for England Series 2025 : इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने शनिवार 11 जानेवारी 2025 रोजी संघाची घोषणा केली. मोहम्मद शमी संघात परतला आहे, तर ऋषभ पंतला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली, भारत 22 जानेवारी रोजी पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. अक्षर पटेलला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
नोव्हेंबर 2023 नंतर मोहम्मद शमी पहिल्यांदाच भारतीय संघाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे निवडकर्त्यांनी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल यांना संघात स्थान दिले नाही. याशिवाय, आणखी 4 खेळाडू होते ज्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरही संघात स्थान मिळाले नाही.
यशस्वी जैस्वाल
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या यशस्वी जैस्वालला टी-20 संघात स्थान मिळालेले नाही. जैस्वालने 2024 मध्ये 8 टी-20 सामने खेळले आणि या काळात 293 धावा केल्या. यामध्ये सर्वोच्च धावसंख्या 93 धावा होती. असे असूनही, यशस्वी जैस्वालकडे दुर्लक्ष करण्यात आले. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही जैस्वालने चांगली कामगिरी केली.
ऋतुराज गायकवाड
महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत दुर्लक्षित केले जात आहे. उलट गायकवाडने घरच्या संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत. सध्या गायकवाडच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने विजय हजारे ट्रॉफीमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. याशिवाय, गायकवाडने 2023 मध्ये 356 धावा केल्या, तर 2024 मध्ये त्याने 133 धावा केल्या.
ऋषभ पंत
ऋषभ पंतला टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात स्थान मिळाले होते आणि त्याने शानदार कामगिरी केली. गेल्या वर्षी पंतने 10 टी-20 सामने खेळले आणि 222 धावा केल्या. तथापि, पंतला एकदिवसीय संघात स्थान मिळणे निश्चित असल्याचे मानले जात आहे.
रजत पाटीदार
आयपीएलमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीचे कौशल्य दाखवणारा रजत पाटीदार पुन्हा एकदा टी-20 आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकला नाही. पाटीदारच्या दुर्लक्षामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होते, कारण त्याने गेल्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलीच नाही तर मध्य प्रदेशला मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीतही नेले. पाटीदारने संपूर्ण स्पर्धेत अंतिम सामन्यासह 5 अर्धशतके झळकावली. पाटीदारने आयपीएल 2024 मध्ये 395 धावा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये 428 धावा आणि टी-20 मध्ये 823 धावा केल्या आहेत. असे असूनही त्याला संघात स्थान देण्यात आले नाही.
शिवम दुबे
सलग तीन आयपीएल हंगामात आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियात पुनरागमन करणारा आणि टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात 27 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करणारा शिवम दुबे देखील परतलेला नाही. दुखापतीमुळे दुबे बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला होता, पण तेव्हापासून तो परतलेला नाही. दुबेने SMAT च्या 5 डावात फक्त 84 चेंडूत 151 धावा केल्या होत्या.
श्रेयस अय्यर
गेल्या वर्षी स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 चे विजेतेपद जिंकले. त्यानंतर वर्षाच्या अखेरीस, त्याने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी (SMAT) जिंकून दिली. तसेच, आयपीएल मेगा लिलावात त्याला पंजाबने 26.75 कोटी रुपयांना खरेदी केले. असे असूनही, तो भारतीय टी-20 संघात परतला नाही. अय्यरने मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 8 डावांमध्ये 345 धावा केल्या.
इंग्लंडविरुद्ध भारताचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शामी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल.
हे ही वाचा -