Ind vs Ban चेन्नई : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात 10 विकेट्स गमावत 376 धावा केल्या. या प्रत्युत्तरात बांगलादेश केवळ 149 धावाच करु शकला. त्यामुळे भारतीय संघाकडे 227 धावांची आघाडी राहिली. भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यापुढं बांगलादेशच्या फलदाजांना चांगली खेळी करता आली नाही.
बांगलादेशचा संघ जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हापासूनच भारतीय गोलंदाजांचा सामन्यात वर्चस्व राहिले. जसप्रीत बुमराह आणि आकाश दीपने बांगलादेशला सुरुवातीला धक्के दिले. बांगलादेशच्या आघाडीच्या फलंदाजांना जसप्रीत बुमराह आणि आकाश दीपने स्वस्तात बाद केले.
बांगलादेशकडून शानमन इस्लामने 2, झाकीर हसनने 3, कर्णधार नजमूल शांतोने 20, मोमिनूल हकने 0, मुस्तिफिझुर रहीमने 8, शाकीब अल हसनने 32, लिटन दास 22, हसन महमूदने 9, मेहंदी हसनने 27, तस्किन अहमदने 11 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने 4, आकाश दीपने 2, रवींद्र जडेजाने 2, मोहम्मद सिराजने 2 विकेट्स पटकावल्या.
भारताचा डाव यापूर्वी 376 धावांवर आटोपला. आज भारताच्या डावाची सुरुवात झाल्यानंतर लगेचच रवींद्र जडेजा बाद झाला. रवीचंद्रन आश्विन देखील 113 धावांवर बाद झाला. त्यामुळं भारताचा डाव 376 धावांवर आटोपला.
गोलंदाजांनी दिवस गाजवला
भारतानं आज सकाळच्या सत्रात 4 विकेट गमावल्या. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी बांगलादेशच्या सर्व विकेट घेतल्या.भारतानं दुसऱ्या डावाची फलंदाजी सुरु केली आहे. भारताकडून जसप्रीत बुमराह, आकाशदीप, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी दमदार कामगिरी केली आणि बांगलादेशला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं.
भारताकडे पहिल्या डावात 227 धावांची आघाडी
भारतीय क्रिकेट संघानं पहिल्या डावात आर. अश्विन, यशस्वी जयस्वाल आणि रवींद्र जडेजा यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर 376 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र, त्याचवेळी पहिल्या डावात भारताचे दिग्गज फलंदाज अपयशी ठरले. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि शुभमन गिल हे चांगली फलंदाजी करण्यात अपयशी ठरले होते.
पाकिस्तानला पराभूत करुन बांगलादेश भारतात
बांगलादेशनं पाकिस्तानला त्यांच्या होमग्राऊंडवर सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभूत करत मालिका जिंकली होती. बांगलादेशनं पाकिस्तानला पराभूत केल्यानं भारत दौऱ्यात देखील ते त्याच प्रकारची कामगिरी करतात का याकडे लक्ष लागलं होतं. मात्र, चेन्नई कसोटीत पहिल्या दोन दिवसांमध्ये बांगलादेशच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र, फलंदाजांना दमदार कामगिरी करता आलेली नाही.
इतर बातम्या :
जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराजने धडाधड विकेट्स घेतल्या; नवख्या बॉलिंग कोचने काय केले?