India vs Bangladesh: जवळपास अडीच दिवसांचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतरही भारतीय संघाने जबरदस्त आक्रमक खेळ करताना बांगलादेशला दुसऱ्या कसोटीत मंगळवारी 7 विकेट्सने नमवले. या दणदणीत विजयासह भारताने दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी निर्विवादपणे जिंकताना जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC 2025) स्पर्धेच्या गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले. सामनावीर म्हणून यशस्वी जैस्वालला सन्मानित करण्यात आले. तर मालिकावीर म्हणून रविचंद्रन अश्विनला पारितोषिक मिळाले.
सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी (India vs Bangladesh) एकही षटक न होता दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. मात्र चौथ्या दिवशी कसोटी सामन्यात टी-20 सारखी फलंदाजी करत टीम इंडियाने विजय जवळपास निश्चित केला. बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची ही मालिका टीम इंडियाने 2-0 अशा फरकाने जिंकली. कसोटी मालिकेतील पाचव्या दिवसाच्या पहिल्याच सेशनमध्ये बांगलादेशचा संघ ढेपाळला. भारतीय संघाला दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी बांगलादेशने 95 धावांचं आव्हान दिलं. भारतीय संघाने हे आव्हान 17.2 षटकामध्ये पूर्ण करत विजय मिळवला.
बांगलादेशचा पराभव केल्यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?
चौथ्या दिवशी जेव्हा सामना सुरू झाला तेव्हा शक्या तितक्या लवकर बांगलादेशला ऑलआऊट करण्यावर आमचा भर होता आणि आम्हाला पाहायचं होतं की फलंदाजी करताना आम्ही काय करू शकतो. जास्तीत जास्त नेट रेन रेट धावा करत चांगली धावसंख्या उभारायची होती, असं रोहित शर्माने सांगितले. आम्ही आक्रमक खेळण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मोठी जोखीम होती. मात्र आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी तयारी होतो. खेळपट्टीमधून फार मदत मिळत नव्हती. परंतु या खेळपट्टीवर सामन्याचा निकाल लागणे, हे खूप कौतुकास्पद असल्याचं रोहित शर्माने सांगितले.
द्रविडची आठवण, गंभीरचं कौतुक-
रोहित शर्मा पुढे म्हणाला की, आमची सुरुवात चांगली झाली. आपल्याला वेगवेगळ्या लोकांसोबत काम करावं लागतं. जेव्हा राहुल द्रविड म्हणाला की तो आता काम थांबवत आहे, तेव्हा आम्ही अनेक आठवणी पुढे घेऊन गेलो. गौतम गंभीरबाबत सांगायचे तर मी त्याच्यासोबत देखील खेळलो आहे. त्यामुळे गंभीरची मानसिकता मला माहिती आहे. हे सुरुवातीचे दिवस आहेत, पण आमची सुरुवात चांगली झाली आहे, असं रोहित शर्मा म्हणाला.
संबंधित बातमी:
Ind vs Ban: रोहित शर्माचा अफलातून झेल; स्वत:लाही बसला नाही विश्वास, मैदानातील सर्व अवाक, Video