Ind vs Ban Rohit Sharma: भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात दुसरा कसोटी सामना कानपूरमध्ये सुरु आहे. सामन्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पावसामुळे एकही चेंडू न टाकता खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आज चौथा दिवस असून सामन्याला नियमित वेळेत सुरुवात झाली. तसेच आजच्या दिवशी एकूण 98 षटकांचा खेळ होणार आहे. 


बांगलादेशची सध्या फलंदाजी (India vs Bangladesh) सुरु आहे. बांगलादेशने 6 विकेट्स गमावत 205 धावा केल्या आहेत. बांगलादेशकडून मोमीनूल हकने दमदार शतक ठोकले. बांगलादेशकडून त्याने सर्वाधिक धावा केल्या. तर भारताकडून आकाश दीप आणि रवीचंद्रन अश्विनने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराजने प्रत्येकी 1 विकेट घेतली. 


रोहित शर्माचा अफलातून झेल; पाहा Video


बांगलादेशचा फलंदाज लिटन दासला 13 धावांवर मोहम्मद सिराजने झेलबाद केले. कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) अफलातून झेल घेत लिटन दासला माघारी पाठवले. यावेळी झेल घेतल्यानंतर रोहित शर्मालाही विश्वास बसला नाही. त्यामुळे त्याच्यासह मैदानातील सर्व खेळाडूही अवाक झाले. 






आतापर्यंत सामना कसा राहिला?


27 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसामुळे खेळ एक तास उशिराने सुरू झाला. त्यानंतर लंच ब्रेकनंतर सामना पावसामुळे थांबवण्यात आला. यानंतर पावसामुळे चेंडू न टाकता दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. त्यानंतर तिसऱ्या दिवशीही असेच दृश्य पाहायला मिळाले. तिसरा दिवसही एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. तिसऱ्या दिवशी पाऊस नसला तरी ओल्या मैदानामुळे तिसऱ्या दिवशी खेळ सुरू होऊ दिला नाही. दरम्यान, दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला होता. या सामन्यात भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला. 


WTC च्या गुणतालिकेत टीम इंडिया अव्वल-


WTC च्या गुणतालिकेत सध्या टीम इंडिया 71.67% गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया 62.50% गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा पराभव करत श्रीलंका तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. श्रीलंकेचे 55.56% गुण झाले आहेत. तर इंग्लंडचा संघ 42.19% गुणांसह चौथ्या, 39.29% गुणांसह बांग्लादेश पाचव्या, 38.89 % गुणांसह दक्षिण अफ्रिका सहाव्या, 37.50 % गुणांसह न्यूझीलंड सातव्या स्थानावर आहे. तर 19.5 % गुणांसह पाकिस्तानचा संघ आठव्या क्रमांकावर आणि 18.52 वेस्ट इंडिजचा संघ नवव्या स्थानावर आहे.


संबंधित बातमी:


IPL 2025: रोहित, विराटपासून धोनीपर्यंत...; फ्रँचायझी कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवणार?, संभाव्य यादी आली समोर