Babar Azam: पाकिस्तान क्रिकेटमध्ये (Pakistan Cricket Board) पुन्हा भूकंप झाल्याचं समोर आलं आहे. आयसीसी टी-20 विश्वचषकाआधी पाकिस्तान संघाचे (Pakistan Team) कर्णधारपद सोपवण्यात आलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत बाबर आझमने हे जाहीर केलं आहे. याआधी देखील बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता पुन्हा राजीनामा जाहीर केल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डात वाद असल्याचं दिसून येत आहे. 


भारतात झालेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तान संघाच्या खराब कामगिरीनंतर बाबर आझमने (Babar Azam) कर्णधारपद सोडले होते. यानंतर शाहीन शाह आफ्रिदीला टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले. मात्र, शाहीनच्या नेतृत्वाखाली संघाने न्यूझीलंडमध्ये खराब कामगिरी केली. अशा परिस्थितीत टी-20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने बाबरवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत त्याच्याकडे एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोपवले होते. पण, आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. तसेच गेल्या काही दिवसांतील खराब कामगिरीमुळे बाबर आझम टीकाकारांच्या निशाण्यावर होता. त्यामुळे बाबर आझमने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 


बाबर आझम काय म्हणाला?


कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयाबाबत बोलताना बाबर आझमने सोशल मीडियावर म्हणाला की, मी कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. या संघाचे नेतृत्व करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. पण आता कर्णधारपदावरुन पायउतार होऊन माझ्या खेळाकडे लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. कर्णधारपदामुळे कामाचा ताण वाढला. मला माझ्या कामगिरीला प्राधान्य द्यायचे आहे, माझ्या फलंदाजीचा आनंद घ्यायचा आहे आणि माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. तुमच्या अतूट पाठिंबा आणि माझ्यावरील विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे. तुमचा उत्साह माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आम्ही एकत्रितपणे जे काही साध्य केले आहे त्याचा मला अभिमान आहे आणि एक खेळाडू म्हणून, ज्या संघाचे योगदान सुरू ठेवण्यासाठी मी उत्सुक आहे. तुमच्या प्रेमासाठी आणि समर्थनासाठी धन्यवाद, असं बाबर आझमने म्हटलं आहे.


बाबर आझमची पोस्ट-






बाबर आझमचा कर्णधारपदाचा विक्रम


2019 ते 2024 दरम्यान, बाबर आझमने 20 कसोटी, 43 एकदिवसीय आणि 85 टी-20 सामन्यांमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले. 2022 च्या ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानला पोहचवण्यात मोठा वाटा होता. मात्र अंतिम सामन्यात पाकिस्तानला इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. 


संबंधित बातमी:


Ind vs Ban: कानपूर टेस्ट 5 कारणांमुळे क्रिकेटच्या इतिहासात अजराअमर ठरणार; प्रेक्षक हे क्षण विसरुच शकणार नाहीत!