IND vs BAN : भारत आणि बांगलादेश (India vs bangladesh) यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यात टीम इंडियाला एका विकेटने पराभवाला सामोरं जावं लागलं. पण पराभवाबरोबरच स्लो ओव्हर रेटही भारतासाठी अडचणीचा ठरला. यामुळे संघाला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. स्लो ओव्हर रेटसाठी भारतीय संघाला मॅच फीच्या 80 टक्के दंड भरावा लागला.


सामनाधिकारी आणि आयसीसी पॅनलचे सदस्य राजन मदुगले यांनी संघाला हा दंड ठोठावला आहे. भारतीय संघ वेळेवर षटकं पूर्ण करू शकला नाही. संघ वेळेपेक्षा चार षटकं मागे होता. आयसीसीच्या कलम 2.22 नुसार, प्रत्येक षटकासाठी सर्व खेळाडूंच्या मॅच फीच्या 20 टक्के रक्कम कापली जाईल. भारतीय संघ वेळेपेक्षा 4 षटके मागे होता. त्यामुळे सर्व खेळाडूंच्या फीपैकी 80 टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात आली.  


सामन्याचा लेखा-जोखा


सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर गोलंदाजांनी सुरुवातही चांगली केली. सलामीवीर शिखर आणि रोहित अनुक्रमे 7 आणि 27 धावा करुन बाद झाले. विराटही 9 धावा करुन तंबूत परतला. श्रेयस आणि केएल यांनी काही काळ डाव सावरला. पण श्रेयस 24 धावा करुन बाद झाला. मग वॉशिंग्टन सुंदरही 19 धावा करुन तंबूत परतला. केएल राहुलने एकहाती झुंज कायम ठेवत अर्धशतक पूर्ण केलं. त्याच्या 73 धावांच्या जोरावर भारत 186 धावांपर्यंत पोहचू शकला. राहुलने 70 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार ठोकत 73 धावा केल्या. तर बांगलादेशकडून स्टार ऑलराऊंडर शाकिब अल् हसन याने महत्त्वपूर्ण असे 5 विकेट्स घेत कमाल गोलंदाजी केली. ए. हुसेन यानेही तब्बल 4 विकेट्स घेतले, तर मेहिदी मिराजने एक गडी बाद केला.


187 धावांचे माफक लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या बांगलादेशने पहिल्या चेंडूवर विकेट गमावली. पण नंतर कर्णधार लिटन दासच्या 41 धावांच्या जोरावर त्यांनी डाव सावरला. दासला अनमूल (14) आणि शाकिब (29) यांची साथ मिळाली. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करत एक-एक करत बांगलादेशच्या फलंदाजांना तंबूत धाडण्यास सुरुवात केली. 39.3 ओव्हरमध्ये 136 धावांवर बांगलादेशचे 9 गडी तंबूत परतले. त्यानंतर भारत सहज सामना जिंकेल असं वाटत होतं. पण तेव्हाच मेहदी हसननं मुस्तफिजूरसोबत अर्धशतकी भागिदारी करत सामना बांगलादेशला जिंकवून दिला. मेहदीनं नाबाद 38 आणि रेहमाननं नाबाद 10 धावा केल्या. विशेष म्हणजे मेहदी 15 धावांवर असताना तो झेलबाद होणार होता. पण केएल राहुलनं त्याचा सोपा झेल सोडला आणि सामना गमावण्यात हेच मोठं कारण ठरलं.  


हे देखील वाचा-