(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नॅथन लियॉन अन् कमिन्सचा विराट कसा करणार सामना? त्यांच्याविरोधात किंग कोहलीची आकडेवारी
IND vs AUS Test : टी 20 आणि वनडे नंतर विराट कोहली कसोटी शतक झळकावणार का? असा प्रश्न सर्वांना पडलाय.
IND vs AUS Test, Virat Kohli vs Nathan Lyon, Pat Cummins : यंदाच्या वर्षातील पहिल्या कसोटी मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज आहे. नऊ फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलियात यांच्यात बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत विराट कोहलीच्या कामगिरीवर सर्वांचं विशेष लक्ष असणार आहे. कारण, टी 20 आणि वनडे नंतर विराट कोहली कसोटी शतक झळकावणार का? असा प्रश्न सर्वांना पडलाय. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून विराट कोहलीला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आलं नव्हतं. पण गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीची बॅट पुन्हा तळपायला सुरुवात झाली आहे. वनडे आणि टी 20 मध्ये विराट कोहलीनं शतक झळकावलेय. आता कसोटीत विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यात विराट कोहलीसमोर नॅथन लियॉन आणि पॅट कमिन्स यांचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. कारण हे दोन्ही गोलंदाज विराट कोहलीसाठी डोकेदुखी ठरलेत.
नॅथन लियॉन विरोधात कोहलीची कामगिरी ?
कसोटीत नॅथन लियॉन याने विराट कोहलीला आतापर्यंत 782 चेंडू फेकले आहेत. यामध्ये कोहलीनं 58.6 च्या सरासरीने 410 धावा काढल्यात आहे. विराट कोहलीने लियॉनला 36 चौकार आणि दोन षटकार लगावले आहेत. तर लियॉन यानं कोहलीला 514 निर्धाव चेंडू फेकले आहेत. लियॉन यानं विराट कोहलीला आतापर्यंत सात वेळा विराट कोहलीला बाद केलेय. 2013 मध्ये तीन वेळा, 2014 मध्ये एक, 2017 मध्ये एक वेळा आणि 2018 मध्ये 2 वेळा बाद केलेय. दोन्ही खेळाडूंमध्ये रंगतदार सामना पाहायला मिळालाय.
पॅट कमिन्सचा कोहली कसा करणार सामना, पाहा काय सांगतेय आकडेवारी ?
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सविरोधात विराट कोहलीचे आकडे चांगले नाहीत. कमिन्सच्या भेदक माऱ्यापुढे विराट कोहलीची बॅट शांतच राहिलेली आहे. कसोटीत विराट कोहलीविरोधात पॅट कमिन्सने प्रभावी मारा केलाय. कसोटी क्रिकेटमध्ये पॅट कमिन्सनं विराट कोहलीला सर्वाधिक वेळा बाद केलेय. पॅट कमिन्सनं कसोटी विराट कोहलीला पाच वेळा बाद केलाय. तर विराट कोहलीला पॅट कमिन्सविरोधात 19 डावात फक्त 82 धावा काढता आल्यात.
नागपूरच्या मैदानावर विराटच किंग, काय सांगतात आकडे?
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. या मैदानावर विराट कोहलीचा जबरदस्त रेकॉर्ड आहे. कोहलीने याठिकाणी तीन सामन्यांत 88.50 च्या सरासरीने 354 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन शतकी खेळीही पाहायला मिळाली, ज्यामध्ये कोहलीने एका डावात 213 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, कसोटी फॉरमॅटमध्ये विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा रेकॉर्डही शानदार आहे. कोहलीने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या 20 कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत 48.06 च्या सरासरीने 1682 धावा केल्या आहेत. त्यात 7 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.