IND vs AUS : टी. नटारजनने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने पहिल्याच सामन्यात आपल्या प्रभावी गोलंदाजीने सर्वांचं मन जिंकलं. टी. नटराजनने कॅनबरामध्ये खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 10 ओव्हर्समध्ये 70 धावा देत 2 विकेट्स घेतले.


नटराजनने मार्नस लाबुशेनला केवळ 7 धावांवर माघारी पाठवत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला पहिला विकेट घेतला. त्यानंतर त्याने एश्टन एगरला माघारी धाडलं. नटराजनने आयपीएलमध्ये केलेल्या धडाकेबाज खेळीमुळे त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. दरम्यान, नटराजनने हे यशाचं शिखर गाठण्यापूर्वी त्याचा संघर्ष फार मोठा होता. जाणून घेऊया टी. नटराजनच्या यशाची कहाणी...



नटराजन सलेम जिल्ह्यातील एक छोटं गाव चिन्नाप्पमपट्टी येथील रहिवाशी आहे. जे चेन्नईपासून जवळपास 340 किलोमीटर दूर आहे. नटराजनचे वडील मजुरी करत होते. तर त्याची आई रस्त्या शेजारी असणाऱ्या एका छोट्याशा दुकानात नाश्ता विकत होती. एका मुलाखतीत बोलताना नटराजनने सांगितलं होतं की, त्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. पाच भावंडांमध्ये नटराजन सर्वात मोठा असून त्याच्यावर अनेत जबाबदाऱ्या होत्या. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या नटराजन आपल्या करिअरच्या सुरुवातीला केवळ टेनिल बॉलनेचे क्रिकेट खेळत होता.


आपल्या कुटुंबाच्या संघर्षाच्या वेळी नटराजनने तमिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) मध्ये स्थान मिळवलं. तिथे त्याने अत्यंत उत्तम खेळी केली होती. त्यानंतर मात्र नटराजनचं नशीब पालटलं. 2016-17 च्या रणजी ट्रॉफीच्या सीझन दरम्यान नटराजनने 9 सामन्यांमध्ये 27 विकेट्स घेतले होते. नटराजन आज आपल्या उत्तम यॉर्कर गोलंदाजीसाठी ओळखला जातो. 2017च्या आयपीएलच्या लिलावात किंग्स इलेव्हन पंजाबने नटराजनसाठी 3 कोटी रुपयांची बोली लावली होती.



टी. नटराजन यंदाच्या आयपीएलमधील यॉर्कर किंग


नटराजनने सनरायझर्स हैदराबादसाठी खेळताना आयपीएलमध्ये उत्तम खेळी केली आणि सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं. डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या या गोलंदाजाने आयपीएल 2020 मध्ये हैदराबादसाठी खेळताना 16 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये नटराजन यॉर्कर किंग म्हणून ओळखला गेला. नटराजनने आयपीएलच्या 13व्या सीझनमध्ये सर्वाधिक 54 यॉर्कर टाकले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :