Ind vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा तिसरा आणि अंतिम सामना मनुका ओव्हल मैदानावर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 13 धावांनी शानदार विजय नोंदवला. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत 5 गडी गमावून 302 धावा केल्या.


303 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 49.3 षटकांत 289 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियन संघाने तीन सामन्यांची वनडे मालिका यापूर्वीच आपल्या नावे केली आहे. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली आहे.


धवनने 16, शुभमन गिलने 33 विराट कोहलीने 63, अय्यर 19, हार्दिक पांड्याने नाबाद 92 आणि रवींद्र जडेजाने नाबाद 66 धावा केल्या. पांड्या आणि रवींद्र जडेजाच्या शानदार डावामुळे भारताने 303 धावांची मजल मारली. विराटने त्याच्या खेळीदरम्यान 5 चौकार लगावले. तर पांड्याने 7 चौकार आणि एक षटकार लगावला. त्याचवेळी जडेजाने 5 चौकार आणि तीन षटकार लगावले.


पांड्या आणि जडेजाने अखेरच्या सात षटकांत जोरदार फलंदाजी केली आणि 93 धावा केल्या. या दोन्ही खेळाडूंनी कांगारू संघाविरूद्ध भारताच्या सहाव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी केली.

ऑस्ट्रेलियाकडून फिंचने 82 चेंडूंत 75 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने सात चौकार आणि तीन षटकार लगावले. त्याचवेळी ग्लेन मॅक्सवेलने 38 चेंडूत 3 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 59 धावा केल्या. मात्र, मॅक्सवेल तिसर्‍या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देऊ शकला नाही. जोपर्यंत तो क्रीजवर होता, असे वाटत होते की ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकेल. पण तो बाद होताच संघाची पडझड सुरु झाली आणि भारतीय संघाने तिसर्‍या वनडेमध्ये नेत्रदीपक विजय नोंदविला.

भारताकडून शार्दुल ठाकूर उत्कृष्ट गोलंदाजी करत 3 गडी बाद केले तर बुमराह आणि टी नटराजनने यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. याशिवाय कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांना 1-1 असे यश मिळाले. टी नटराजनने पदार्पण सामन्यात शानदार गोलंदाजी केली. टी नटराजनने 10 षटकांत 1 निर्धाव षटकासह 70 धावा देऊन 2 बळी घेतले. त्याने पहिल्याच सामन्यात आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे.