IND vs AUS, 3rd Test, Day 2 Stumps Score | दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारत 2 बाद 96 धावा
ऑस्ट्रेलियाला 338 धावांवर गुंडाळल्यानंतर भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात करुन दिली. 70 धावांवर भारताने आपली पहिली विकेट गमावली. गिलच्या 50 धावांमुळे टीम इंडिया आश्वासक स्थितीत दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त करण्यात यशस्वी ठरली.
सिडनी : सिडनी कसोटीचा दुसरा दिवस दोन्ही संघांसाठी चांगला ठरला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने दोन विकेट्सच्या मोबदल्यात 96 धावा केल्या आहे. पहिल्या डावात भारतीय संघ ऑस्ट्रेलियापासून अजूनही 242 धावांनी पिछाडीवर आहे. खेळ संपला त्यावेळी चेतेश्वर पुजारा 9 आणि अजिंक्य रहाणे 5 धावांवर खेळत आहेत.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना भारताच्या दोन्ही सलामीवीरांना माघाडी धाडण्यात यश आलं. खरंतर दोघांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. दोघांनी मिळून 70 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर रोहित शर्मा 26 धावांवर असताना हेजलवूडने त्याला बाद केलं. हेजलवूड स्वत:च्या चेंडूवर रोहितचा झेल टिपला. तर दुसरीकडे शुभमन गिलने आपल्या कसोटी क्रिकेटमधील पहिलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 100 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 50 धावा पूर्ण केल्या. परंतु तो पॅट कमिन्सचा शिकार ठरला. कॅमरुन ग्रीनने त्याचा झेल घेतला. त्यावेळी भारताची धावसंख्या 2 बाद 85 अशी होती.
रोहित शर्मा आणि शुभमन गिल बाद झाल्यानंतर भारताच्या धावसंख्येचा वेग मंदावला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांना 11 धावांचीच भर टाकता आली.
दरम्यान ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांवर आटोपला. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच 300 धावांचा टप्पा पार केला. स्टीव स्मिथचा फॉर्म परत येणं ही ऑस्ट्रेलियासाठी दिलासादायक गोष्ट आहे. स्मिथच्या 131, लाबुशेनच्या 91 आणि पुकोवस्तीच्या 62 धावांच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 338 धावा केल्या.
तर भारतासाठी रवींद्र जडेजाने चार, जसप्रीत बुमरा आणि नवदीप सैनीने प्रत्येकी दोन तर मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली.
पहिल्या दिवशी पावसामुळे बरीच षटकं वाया गेली. त्याची भरपाई करण्यासाठी आजप्रमाणे तिसऱ्या दिवशीही अर्धा तास आधी खेळाला सुरुवात होईल. म्हणजेच भारतीय वेळेनुसार पहाटे साडेचार वाजता तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होईल.