(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AFG : गिलच्या जागी ईशान निश्चित, तरीही अफगाणविरोधात प्लेईंग 11 चा पेच, एका जागेसाठी तीन दावेदार
IND vs AFG, World CUP 2023 : बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करणाऱ्या भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरोधात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे.
IND vs AFG, World CUP 2023 : भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यामध्ये आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअममध्ये (Arun Jaitley Stadium) आमना सामना होणार आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करणाऱ्या भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरोधात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. सलामी फलंदाज शुभमन गिल अद्याप आजारपणातून सावरलेला नाही, त्यामुळे त्याची कमी भारतीय संघाला नक्कीच जाणवेल. आजच्या प्लेईंग 11 मध्ये कुणाला संधी मिळणार याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना रोहित शर्माने प्लेईंग 11 संदर्भात हिंट दिली होती. त्यानुसार, भारतीय संघाचे 10 शिलेदार ठरले आहेत. एका जागेसाठी 3 खेळाडूमध्ये चुरस लागली आहे. पाहूयात, आजच्या सामन्यात भारताची प्लेईंग 11 कशी असू शकते.
आघाडीच्या फळीमध्ये कोण कोण ?
कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन सलामीला येतील, यात शंकाच नाही. हे दोन्ही खेळाडू सलामीच्या सामन्यात शून्यावर बाद झाले होते. पण आजच्या सामन्यात इशान किशनला स्वत:ला सिद्ध कऱण्याची पुन्हा एकदा संधी असेल. दिल्लीच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडणार आहे. दक्षिण आफ्रिका संघाने येथे झालेल्या पहिल्या सामन्यात धावांचा पाऊस पाडला होता. त्यामुळे या मैदानावर भारतीय फलंदाजही धावांचा पाऊस पाडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रोहित शर्मा आणि ईशान डावाची सुरुवात करतील. तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली जबाबदारी संभाळेल. चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव याला संधी देण्यात येईल. ऑस्ट्रेलियाविरोधात श्रेयस अय्यर शून्यावर बाद झाला होता. पण अय्यर गेल्या काही दिवसांपासून चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी करतोय, त्यामुळे त्याच्यावर विश्वास दाखवला जाईल.
मध्यक्रममध्ये कोण कोण ?
केएल राहुल याने विकेटकीपर आणि फलंदाज म्हणून उजवी कामगिरी केली आहे. कांगारुविरोधात राहुलने नाबाद 97 धावांची खेळी केली होती. त्याच्या जोडीला हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा हे अष्टपैलू खेळाडू आपली चुणूक दाखवण्यास तयार आहे.
गोलंदाजीत कोण कोण ?
कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांची जागा निश्चित आहे. एका स्थानासाठी पेच फसताना दिसतोय. अश्विन, शार्दूल आणि मोहम्मद शामी यांच्यापैकी कुणाला संधी मिळणार ? याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. दिल्लीचे मैदान छोटे असल्यामुळे अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवण्याची शक्यता आहे. मोहम्मद शामी आणि शार्दूल ठाकूर यांच्यापैकी एका गोलंदाजाची निवड होऊ शकते. शार्दूल ठाकूर तळाला फलंदाजी करु शकतो, त्यामुळे त्याचा नावाचा जास्त विचार केला जाऊ शकतो. पण दुसरीकडे मोहम्मद शामी याने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात शामी आघाडीवर आहे. 2019 च्या विश्वचषकात शामी याने हॅट्ट्रीक घेतली होती. त्यामुळे शामीला संधी दिली जाणार का? दिल्लीच्या खेळपट्टीवर शामी प्रभावी मारा करु शकतो. भारतीय संघ अफगाणिस्तानला हलक्यात घेणार नाही. पूर्ण ताकदीने भारतीय संघ दिल्लीत उतरेल, यात कोणतीही शंकाच नाही.
अफगाणिस्तानविरोधात भारताचे 11 शिलेदार कोणते ?
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशान, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर/मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह