Ravindra Jadeja Pushpa Celebration : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारताने 62 धावांनी श्रीलंकेला मात दिली. या सामन्यांपूर्वी झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यांच्या तुलनेत संघात काही महत्तपूर्ण बदल झाले. यातील एक म्हणजे स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा संघात परतला. दरम्यान संघात परतलेल्या रवींद्रला आज खास कामगिरी करण्याची संधी मिळाली नाही. पण एकमेव विकेट घेतल्यानंतर त्याने केलेलं पुष्पा सेलिब्रेशन चांगलच व्हायरल होत आहे.


जाडेजा मागील काही सामन्यांपासून दुखापतीमुळे विश्रांतीवर होता. वेस्ट इंडीजविरुद्धही तो दिसला नाही. दरम्यान श्रीलंकेविरुद्ध मात्र जाडेजा मैदानात उतरला. यावेळी फलंदाजीत त्याला अधिक चेंडू न मिळाल्याने तो नाबाद 3 धावाच करु शकला. तर गोलंदाजीमध्ये मात्र त्याने 4 षटकांत 28 धावा देत एक महत्त्वाची विकेट घेतली. त्याने श्रीलंकेचा यष्टीरक्षक दिनेश चंडीमलला बाद केलं. हीच विकेट घेतल्यानंतर त्याने पुष्पा टाईप सेलिब्रेशन केलं. प्रसिद्ध दाक्षिणात्या चित्रपट पुष्पामधील हिरो अल्लू अर्जून ज्याप्रमाणे दाढीवरुन हात फिरवतो, तसाच हात जाडेजाने ही विकेट घेतल्यानंतर फिरवला. चेन्नई सुपरकिंग्सने जाडेजाचा हा फोटो शेअर केला आहे.



भारताचा 62 धावांनी विजय


भारत आणि श्रीलंका यांच्यातील या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. ज्यामुळे फलंदाजीला भारताला आधी यावं लागलं. भारताकडून ईशान आणि रोहित या दोघांनी सुरुवातीपासून फटकेबाजी सुरु केली. ईशानने 30 चेंडूत अर्धशतक झळकावलं. तर रोहित मात्र अर्धशतकाजवळ पोहचत 44 धावांवर बाद झाला. ज्यानंतर श्रेयस आणि ईशानने डाव सांभाळला. ईशानने 56 चेंडूत 89 धावा केल्या. त्याने 10 चौकार आणि 3 षटकार ठोकले. तर त्यानंतर श्रेयस अय्यर याने नाबाद 57 धावा लगावत धावसंख्या 199 पर्यंत पोहोचवली. ज्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी 200 धावांची गरज होती. यावेळी भारताने भेदक गोलंदाजी करत 20 षटकांत अवघ्या 137 धावांत श्रीलंकेला रोखलं. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि वेंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी 2 तर चहल आणि जाडेजा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. तर श्रीलंकेकडून चारित असालंका याने एकाकी झुंज देत नाबाद 53 धावा केल्या पण त्याला हवी तशी साथ न मिळाल्याने श्रीलंका 62 धावांनी पराभूत झाली. 



 हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha