Pakistan vs Bangladesh 1st Test : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथील क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. सामन्याच्या पाचव्या दिवशी बांगलादेश संघाने पाकिस्तानचा दहा गडी राखून पराभव करत नवा इतिहास रचला. बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यासह, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल दिसून आला आहे. बांगलादेशने WTC फायनल खेळण्याच्या पाकिस्तानच्या आशा धुळीस मिळवल्या आहेत. त्याचबरोबर इंग्लंडनेही श्रीलंकेविरुद्धच्या विजयासह मोठी झेप घेण्यात यश मिळवले आहे. 


आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023-25 ​​गुणतालिकेत बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर पाकिस्तान संघांची सातव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्याच्या खात्यात 22 गुण आहेत आणि गुणांची टक्केवारी 30.56 आहे. त्यामुळे मायदेशातील पराभवानंतर पाकिस्तानची स्थिती बिकट झाली आहे. 


तर या विजयासह बांगलादेशचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या गुणांची टक्केवारी 40 वर पोहोचली आहे. आणि बांगलादेशचे खात्यात 24 अंक आहेत. 


बांगलादेशने पाकिस्तानचा केला पराभव 


रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव केला. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने पहिल्या डावात 6 बाद 448 धावा करून डाव घोषित केला. प्रत्युत्तरात बांगलादेशने 565 धावा केल्या आणि 117 धावांची आघाडी घेतली. बांगलादेशने दुसऱ्या डावात पाकिस्तानला 146 धावांत गुंडाळले. बांगलादेशने 30 धावांचे लक्ष्य 10 गडी राखून पूर्ण केले.


गुणतालिकेत इंग्लंड चौथ्या स्थानावर 


दुसरीकडे, इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाच गडी राखून विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. ओली पोपच्या नेतृत्वाखालील संघाने श्रीलंकेचा पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या चक्रातील 14 कसोटी सामन्यांमधील इंग्लंडचा हा सातवा विजय आहे. यासह त्याचे गुण 69 इतके वाढले असून गुणांची टक्केवारी 41.07 झाली आहे. इंग्लंडचा संघ आता चौथ्या स्थानावर पोहोचला असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी दावा केला आहे. यापूर्वी संघ सहाव्या स्थानावर होता.


भारत अव्वल स्थानावर कायम 


भारत आणि गतविजेता ऑस्ट्रेलिया अनुक्रमे 68.5 आणि 62.5 गुणांसह अव्वल दोनमध्ये कायम आहेत. भारतीय संघाला सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईत होणार आहे. तर, दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये होणार आहे. यानंतर नोव्हेंबरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रतिष्ठेच्या पाच सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळली जाईल.


हे ही वाचा :


Pak vs Ban 1st Test : रावळपिंडीच्या मैदानावर पाकिस्तानने खाल्ली माती! बांगलादेशने रचला मोठा इतिहास