Virat Kohli On Shikhar Dhawan Retirement : शनिवारी (24 ऑगस्ट) सकाळी भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला, कारण अनेक वर्षांपासून टीम इंडियासाठी डावाची सुरुवात करणाऱ्या शिखर धवनने निवृत्तीची घोषणा केली. धवनला काही काळापासून भारतीय संघात संधी मिळाली नव्हती आणि आता त्याने आपली कारकीर्द संपुष्टात आणली आहे.
गब्बरच्या निवृत्तीबद्दल चाहत्यांसह टीम इंडियामध्ये त्याच्यासोबत खेळलेले खेळाडू तसेच अनेक माजी क्रिकेटपटूंनीही त्याला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, धवनचा चांगला मित्र असलेल्या भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आता प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये कोहलीने शिखरचे खूप कौतुक केले आहे.
रविवारी विराट कोहलीने शिखर धवनच्या निवृत्तीबद्दल एक खास ट्विट केले. कोहलीने आपल्या ट्विटमध्ये शिखरचे भरभरून कौतुक केले. किंग कोहलीने लिहिले की, "शिखर, तुझ्या निर्भय पदार्पणापासून ते भारतातील सर्वात विश्वासार्ह सलामीवीर बनण्यापर्यंत, तू आम्हाला जपण्यासाठी असंख्य आठवणी दिल्या. खेळाबद्दलची तुझी आवड, तुझी खिलाडूवृत्ती आणि तुझे ट्रेडमार्क स्मित गमावले जाईल परंतु तुझा वारसा कायम आहे. आठवणींसाठी, अविस्मरणीय कामगिरीबद्दल आणि नेहमी मनापासून नेतृत्व केल्याबद्दल धन्यवाद. मैदानाबाहेर गब्बर, तुझ्या पुढील डावात तुला शुभेच्छा!”
शिखर धवन आणि विराट कोहली दिल्लीचे आहेत आणि दोघांनी एकत्र खूप डोमेस्टिक क्रिकेट खेळले आहे. याशिवाय मैदानाबाहेरही त्यांची मैत्री चांगलीच आहे. आयपीएलमध्येही हे दोघे अनेकदा मस्ती करताना दिसले आहेत.
शिखर धवनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
शिखर धवन 2010 ते 2022 पर्यंत टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता. ऑक्टोबर 2010 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडेमध्ये त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळला. धवनने एकूण 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.
कसोटीत त्याने 40.61 च्या सरासरीने 2315 धावा केल्या. याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यात 44.11 च्या सरासरीने 6793 धावा केल्या आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 27.92 च्या सरासरीने आणि 126.36 च्या स्ट्राईक रेटने 1759 धावा केल्या. धवनने कसोटी क्रिकेटमध्ये 7 शतके आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 17 शतके झळकावली आहेत.
विराट कोहली बांगलादेश मालिकेतून परतणार
टीम इंडिया सध्या ब्रेकवर आहे आणि यादरम्यान काही खेळाडू दुलीप ट्रॉफीमध्ये दिसणार आहेत. पण कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह अनेक खेळाडू केवळ 19 सप्टेंबरपासून होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहेत.
विराटने शेवटची एकदिवसीय मालिका श्रीलंकेत खेळली होती, जी खूप खराब राहिली आणि त्याने आपल्या बॅटने एकही अर्धशतक झळकावले नाही. अशा स्थितीत कोहलीला बांगलादेशविरुद्ध भरपूर धावा करायला आवडेल.
हे ही वाचा :