भारत उपांत्य फेरीत कुणाबरोबर भिडणार? पाकिस्तान, न्यूझीलंड की अफगाणिस्तान, जाणून घ्या समीकरण
WC Semi Final 2023 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यानंतर सेमीफायनलमध्ये पोहचणारा ऑस्ट्रेलिया तिसरा संघ ठरलाय.
WC Semi Final 2023 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यानंतर सेमीफायनलमध्ये पोहचणारा ऑस्ट्रेलिया तिसरा संघ ठरलाय. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी प्रत्येकी सहा सामन्यात विजय मिळवला आहे, ते अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही संघामध्येच दुसरा सेमीफायनलचा सामना होण्याची शक्यता आहे. भारतीय संघ गुणतालिकेत 14 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यांचा सेमीफायनलचा सामना चौथ्या स्थानावरील संघासोबत होणार आहे. पण चौथा संघ अद्याप निश्चित झालेला नाही. न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यापैकी एक संघ चौथ्या स्थानावर जाण्याची शक्यता आहे.
भारताची सेमीफायनल कोणत्या संघासोबत ?
भारतीय संघाने आठ सामन्यात आठ विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. भारतीय संघासोबत चौथ्या क्रमांकाचा संघ भिडणार आहे. यासाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या संघामध्ये स्पर्धा सुरु आहे. या तिन्ही संघाचे आठ सामन्यात आठ गुण आहेत. या तिन्ही संघाला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी विजय गरजेचा आहे. जर तिन्ही संघाने विजय मिळवला तर नेटरनरेटवर चौथा संघ ठरवला जाईल. न्यूझीलंडचा पुढील सामना श्रीलंकासोबत आहे. पाकिस्तानचा संघ इंग्लंडविरोधात भिडणार आहे. तर आफगाण संघासोबत आफ्रिकेचे आव्हान असेल. या तीन संघापैकी एका संघासोबत भारताचा सामना होणार आहे.
नेटरनरेटमध्ये न्यूझीलंड आघाडीवर -
न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या संघाचे आठ सामन्यात प्रत्येकी आठ गुण आहेत. त्यांना अखेरचा सामना जिंकून सेमीफायनलमध्ये पोहचण्याची संधी आहे. नेटरनरेटच्या आधावार उपांत्य फेरीत प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. नेटरनरेटमध्ये न्यूझीलंडचा संघ इतर दोन्ही संघाच्या तुलनेत पुढे आहे. न्यूझीलंडचा नेट रनरेट + ०.398 आहे. न्यूझीलंडला अखेरचा सामना बेंगलोरमध्ये श्रीलंकेशी होणार आहे. लंकेचे आव्हान संपुष्टात आलेय, ते न्यूझीलंडला अडचणीत आणू शकतात. बेंगलोरमध्ये पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे न्यूझीलंडला चांगल्या फरकाने जिंकण्यासोबतच, पाकिस्तान (अधिक 0.036) आणि अफगाणिस्तान (- 0.038) पराभूत व्हावे, अशी प्रार्थना करावी लागेल.
पाकिस्तान संघाला इंग्लंडचा सामना करावा लागणार आहे. इंग्लंडचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्यामुळे पाकिस्तानपुढे तगडे आव्हान असेल. पाकिस्तान संघाला इंग्लंडचा पराभव तर करावाच लागेल. त्याशिवाय न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्या कामगिरीकडेही लक्ष असेल. न्यूझीलंडने लंकेचा पराभव केला तर पाकिस्तानला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. न्यूझीलंडचा पराभव झाला तर पाकिस्तानचे सेमीफायनलमध्ये पोहचणं सूकर होईल.
अफगाणिस्तान संघाला अखेरच्या सामन्यात आफ्रिकेचा सामना करायचा आहे. त्यामुळे अफगाणिस्तान संघाच्या उपांत्य फेरीतील जाण्याच्या शक्यता कमी आहे. अफगाणिस्तान संघाने आफ्रिकेचा मोठ्या फरकाने पराभव केला तरच उपांत्य सामन्यात प्रवेश मिळेल. त्याशिवाय न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या सामन्याकडेही लक्ष असेल.
कधी आणि कुठे होणार सेमीफायनलचा सामना -
भारतीय संघ गुणतालिकेत असल्यामुळे पहिला उपांत्य सामना खेळणार आहे. विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअवर 15 नोव्हेंबर रोजी होणार आहे. भारताविरोधात पाकिस्तानचा संघ असेल तर हा सेमीफायनलचा सामना कोलकात्याला होणार आहे. पण जर दुसरा संघ असेल तर हा सामना वानखेडे स्टेडिअमवरच रंगणार आहे. हा सामना दुपारी 2 वाजता होईल. त्याआधी अर्धा तास नाणेफेक होणार आहे.