(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Harmanpreet Kaur: मैदानावर गैरवर्तन भोवले; टीम इंडियाची कर्णधार हरमन प्रीतवर दोन सामन्यांची बंदी
Harmanpreet Kaur: भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर आयसीसीने दोन सामन्यांची बंदी घातली आहे.
Harmanpreet Kaur: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला (Harmanpreet Kaur) मोठा धक्का दिला आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसर्या एकदिवसीय सामन्यादरम्यान गैरवर्तनासाठी आयसीसीने तिच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. आयसीसीने हरमनवर दोन सामन्यांची बंदी घातली आहे. मागील आठवड्यात बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात तिला पंचांनी पायचित बाद केले. पंचांच्या निर्णयाने नाराज झालेल्या हरमनने स्टम्पवर आपला राग काढला. त्यानंतर सामना संपवल्यावरही तिने पंच, सामना अधिकाऱ्यांवर टीका केली होती.
आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी हरमनप्रीत कौरला पुढील दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निलंबित करण्यात आले आहे, असे आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे. या निलंबनामुळे हरमनप्रीत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. नाहिदा अख्तरच्या चेंडूवर हरमनप्रीतल पायचित बाद करण्यात आले. पण तो चेंडू तिच्या बॅटला लागला असल्याचा दावा तिने केला. पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वी त्याने आपला राग यष्टींवर काढला.
त्यानंतर हरमनने बक्षीस वितरण समारंभात पंचांवर टीका केली. या मालिकेचे संयुक्त विजेते असलेल्या संघांसोबत पंचांनी ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यावं, असेही हरमनने म्हटले होते.
Indian women's team skipper Harmanpreet Kaur has been suspended for the next two international matches following two separate breaches of the ICC Code of Conduct.
— ANI (@ANI) July 25, 2023
(Pic source: ICC) pic.twitter.com/WBWSJ2HDuk
असभ्य वर्तनामुळे बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाने आपल्या संघासह ते ठिकाण सोडले आणि भारतीय कर्णधाराला शिष्टाचार शिकण्याचा सल्ला दिला.
पंचांच्या निर्णयाला विरोध केल्यामुळे हरमनप्रीतला तिच्या मॅच फीच्या 50 टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे. आयसीसीच्या आचारसंहितेमधील हा लेव्हल 2 चा गुन्हा आहे. याशिवाय, पंचांवर सार्वजनिकपणे टीका केल्याच्या लेव्हल 1 गुन्ह्यासाठी मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला. आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.8 चे उल्लंघन केल्याबद्दल हरमन दोषी आढळली असल्याचे आयसीसीने म्हटले.
भारतीय कर्णधाराने आपला गुन्हा आणि शिक्षा मान्य केली आहे. आयसीसीचे आंतरराष्ट्रीय पॅनल सामनाधिकारी अख्तर अहमद यांनी ही शिक्षा सुनावली. हरमनप्रीतने शिक्षा मान्य केल्यामुळे या प्रकरणाला पुढील सुनावणीची गरज भासली नाही.
भारताचा माजी कर्णधार शांता रंगास्वामीने हरमनप्रीतवर टीका करताना म्हटले की, तिचे वागणे भारतीय कर्णधाराला शोभणारे नाही. रंगास्वामी यांनी पीटीआयला सांगितले की, “तिचे वर्तन निंदनीय होते. ती बाद होण्यापुरता संताप, नाराजी व्यक्त केली असती तर समजू शकतो. मात्र, तिने बक्षीस वितरणातही आपली वर्तवणूक योग्य ठेवली नाही. तिची ही वागणूक खिलाडूवृत्तीसाठी योग्य नसल्याचे शांता रंगास्वामी यांनी म्हटले.